Stock Market Closing Bell | सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारुन बंद, गुंतवणूकदारांनी २.११ लाख कोटी कमावले | पुढारी

Stock Market Closing Bell | सलग चौथ्या दिवशी सेन्सेक्स, निफ्टी वधारुन बंद, गुंतवणूकदारांनी २.११ लाख कोटी कमावले

पुढारी ऑनलाईन : जागतिक सकारात्मक संकेतांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी भारतीय शेअर बाजाराने तेजीचा चौकार मारला. आज सेन्सेक्स आणि निफ्टी सलग चौथ्या दिवशी वधारून बंद झाले. सेन्सेक्स ३७६ अंकांनी वाढून ७२,४२६ वर बंद झाला. तर निफ्टी १२९ अंकांच्या वाढीसह २२,०४० वर स्थिरावला. बाजारातील तेजीत आज ऑटो आणि रियल्टी स्टॉक्स आघाडीवर राहिले. (Stock Market Closing Bell)

निफ्टी पीएसयू बँक, ऑईल आणि गॅस निर्देशांक वगळता इतर सर्व क्षेत्रांमध्ये तेजी राहिली. क्षेत्रीय पातळीवर निफ्टी ऑटोची कामगिरी टॉप परफॉर्मर म्हणून राहिली. निफ्टी ऑटो सुमारे २ टक्क्यांनी वाढला. त्यापाठोपाठ निफ्टी रियल्टी, फार्मा आणि आयटी निर्देशांकही वाढले.

गुंतवणूकदारांना २.११ लाख कोटींचा फायदा

बाजारातील आजच्या १६ फेब्रुवारीच्या तेजीमुळे बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल ३८९.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. गुरुवारी १५ फेब्रुवारी रोजी ते ३८७.३० लाख कोटी रुपयांवर होते. याचाच अर्थ आज बीएसई सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल २.११ लाख कोटी रुपयांनी वाढले.

TVS Motor तेजीत, बाजार भांडवल १ लाख कोटीवर

सेन्सेक्सवर विप्रो, एम अँड एम, एलटी, मारुती, टाटा मोटर्स, इन्फोसिस, नेस्ले इंडिया, अल्ट्राटेक सिमेंट, इंडसइंड बँक हे शेअर्स टॉप गेनर्स राहिले. तर पॉवर ग्रिड, एसबीआय, रिलायन्स, एनटीपीसी हे शेअर्स घसरले.

निफ्टीवर विप्रो, एम अँड, एसबीआय लाईफ, अदानी पोर्टस, मारुती हे शेअर्स २ ते ५ टक्क्यांदरम्यान वाढले. तर पॉवर ग्रिड, एसबीआय, ब्रिटानिया हे शेअर्स घसरले.

टीव्हीएस मोटरची उसळी

TVS मोटर कंपनीचे शेअर्स शुक्रवारी एनएसईवर ४ टक्क्यांपर्यंत वाढून २,१८६ रुपयांच्या उच्चांकावर गेले. त्यानंतर दुपारच्या व्यवहारात हे शेअर्स २,१३९ रुपयांवर आले. (TVS Motor Company Share Price). सकाळच्या व्यवहारातील तेजीमुळे टीव्हीएस मोटर कंपनीचे बाजार भांडवल १ लाख कोटी रुपयांवर पोहोचले.

पेटीएम शेअर्सची रिकव्हरी

पेटीएमची मूळ कंपनी वन ९७ कम्युनिकेशन्सचे शेअर्सने आज सकाळी नव्या सर्वकालीन निचांकी पातळीला स्पर्श केल्यानंतर दुपारच्या व्यवहारात ते ५ टक्क्यांच्या सर्किटवर पोहोचले. बीएसईवर ३१८.३५ रुपयांपर्यंत खाली घसरल्यानंतर हे शेअर्स ३४१.५० रुपयांवर गेले. (One97 Communications Share Price) पेटीएम पेमेंट्स बँकेवर आरबीआयच्या कारवाईनंतर या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली आहे. यामुळे पेटीएमने गेल्या ११ ट्रेडिंग सत्रात सुमारे २७ हजार कोटी रुपयांचे मूल्य गमावले आहे. पण या शेअर्समध्ये रिकव्हरी दिसून आली.

विप्रोचा शेअर्स एका वर्षातील उच्चांकावर

विप्रो लिमिटेडच्या शेअर्समध्ये सलग सहाव्या सत्रात वाढ झाली. आज हा शेअर्स ५ टक्क्यांनी वाढून वाढून ५४५ रुपयांच्या एका वर्षातील उच्चांकावर गेला. त्यानंतर हा शेअर्स ५४२ रुपयांवर स्थिरावला. अलीकडेच या आयटी फर्मने जाहीर केले होते की त्यांनी अमेरिकेतील इन्सुरटेक फर्म अग्ने ग्लोबल इंक आणि त्यांची हैदराबाद येथील संलग्न अग्ने ग्लोबल आयटी सेवा ६६ दशलक्ष डॉलरमध्ये ताब्यात घेतली. (Stock Market Closing Bell)

आशियाई बाजारातील तेजीत हाँगकाँग आघाडीवर

अमेरिकेतील किरकोळ विक्रीत मोठी घसरण झाल्यामुळे व्याजदर कपातीची शक्यता पुनरुज्जीवित झाली आहे. या पार्श्वभूमीवर जपानच्या निक्केईने शुक्रवारी सर्वकालीन उच्चांक गाठला. यामुळे अमेरिकेतील एस अँड पी, नॅस्डॅक कंपोझिट आणि डाऊ जोन्स इंडस्ट्रियल अॅव्हरेज काल गुरुवारी वाढून बंद झाले. तर जपानचा निक्केई १.६ टक्क्यांनी वाढून ३८,८०० वर गेला. त्यानंतर तो ३८,४८७ वर स्थिरावला. हाँगकाँगचा हँग सेंग २.४८ टक्क्यांनी वाढून १६,३३९ वर पोहोचला. (Hang Seng Index)

हे ही वाचा :

Back to top button