Rajya Sabha Elections 2024 | राज्यसभेसाठी जे. पी. नड्डा यांचा गुजरातमधून अर्ज दाखल | पुढारी

Rajya Sabha Elections 2024 | राज्यसभेसाठी जे. पी. नड्डा यांचा गुजरातमधून अर्ज दाखल

पुढारी ऑनलाईन : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी आज गुरुवारी गुजरातमधून राज्यसभेचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. (Rajya Sabha Elections 2024) ”आज मला गुजरातमधून उमेदवारी अर्ज भरण्याचा सन्मान मिळत आहे. मी उमेदवारी अर्ज अनेकवेळा, अनेक पदांसाठी भरले आहेत. पण गुजरातमधून उमेदवारी दाखल करणे ही माझ्यासाठी विशेष सन्मानाची बाब आहे. मला ही संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा आणि निवडणूक समितीचे मनापासून आभार मानतो.” अशी भावना जे. पी. नड्डा यांनी व्यक्त केली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना महाराष्ट्रातुन तर गुजरातमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महाराष्ट्रातुन माजी आमदार मेधा कुलकर्णी, आणि डॉ. अजित गोपछडे यांनाही भाजपने महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी उमेदवारी जाहीर केली. केंद्रीय मंत्री नारायण राणे, पियुष गोयल यांना पुन्हा राज्यसभेवर उमेदवारी देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लोकसभेच्या रिंगणात उतरवले जाण्याची शक्यता आहे. दरम्यान नारायण राणेंपाठोपाठ दुसऱ्या माजी मुख्यमंत्र्यांना भाजपने राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे. गुजरातमधून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकीया, मयंकभाई नायक, जसवंतसिंह सलामसिंह परमार यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गुजरातमधून राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली आहे. यापूर्वी ते हिमाचल प्रदेशातून राज्यसभेचे खासदार होते. हिमाचल प्रदेशात सत्ताबदल झाल्याने आवश्यक संख्याबळ भाजपकडे नाही, त्यामुळे जे. पी. नड्डा यांना इतर राज्यातून राज्यसभेवर जावे लागणार होते. ते लोकसभा लढवू शकतात, अशाही चर्चा होत्या. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारात व्यस्त असताना ते राज्यसभेवरच पुन्हा जातील अशाही चर्चा होत्या. अखेर भाजपने गुजरातमधून त्यांची राज्यसभेची उमेदवारी जाहीर केली.

हे ही वाचा :

 

Back to top button