Rajya Sabha Election 2024 | ब्रेकिंग! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी

Rajya Sabha Election 2024 | ब्रेकिंग! अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी, अजित गोपछडे यांना भाजपकडून राज्यसभेची उमेदवारी
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन : भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभा निवडणुकीसाठी गुजरात आणि महाराष्ट्रातील उमेदवारांची घोषणा केली आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात दाखल झालेले अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांना भाजपने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. तसेच मेधा कुलकर्णी (Medha Kulkarni) आणि डॉ. अजित गोपछडे यांनादेखील महाराष्ट्रातून उमेदवारी दिली आहे. दरम्यान, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि प्रकाश जावडेकर यांना भाजपने राज्यसभेसाठी उमेदवारी दिली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, गोविंदभाई ढोलकिया, मयंकभाई नायक, डॉ. जशवंतसिंह सलामसिंह परमार यांना गुजरातमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यसभेच्या उमदेवारीची समीकरणे बदलली होती. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पीयूष गोयल यांना लोकसभा रिंगणात उतरवले जाणार आहे. राज्यसभेला भाजप एक जादा उमदेवार देत आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी दिली आहे.

नारायण राणे व अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांचे काँग्रेसमध्ये असल्यापासून वितुष्ट होते. अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केल्याने राणेंनी त्या काळी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर तब्ब्ल ८० दिवस राणे मंत्रिमंडळाबाहेर होते. ८० दिवसांनंतर उद्योगमंत्रिपद देऊन राणेंना मंत्रिमंडळात घेण्यात आले होते.

एकेकाळचे राणेंचे काँग्रेसमधील विरोधक भाजपमध्ये आल्यामुळे राणेंनी मंगळवारी फडणवीस यांची भेट घेतली होती. या भेटीत राणे आणि गोयल यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे राणेंना सांगण्यात आल्याचे समजते. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात, तर पीयूष गोयल यांना मुंबईमधून लोकसभेची उमदेवारी दिली जाणार आहे.

दरम्यान, राज्यसभेसाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावे कायम असून यात अशोक चव्हाणांच्या नावाची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपला एक उमेदवार घेणार आहे; तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही मिलिंद देवरा यांना राज्यसभेसाठी उमेदवारी दिली आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. काॅंग्रेससमध्ये फाटाफूट करून भाजप चौथी जागा जिंकण्याच्या तयारीत आहे.

काँग्रेसकडून राज्यसभेसाठी ४ उमेदवारांची घोषणा

दरम्यान, काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यसभेसाठी चार उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये राजस्थानमधून सोनिया गांधी, महाराष्ट्रातून चंद्रकांत हंडोरे तर हिमाचल प्रदेशमधून ज्येष्ठ वकील अभिषेक मनु सिंघवी आणि बिहारमधून डॉ. अखिलेश प्रताप सिंह आणि यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून सोनिया गांधी प्रकृती अस्वस्थ्यामुळे राज्यसभेवर जातील अशा चर्चा होत्या. विविध काँग्रेसशासित राज्यातून तसे प्रस्त्वावही देण्यात आले होते. काँग्रेस पक्षनेतृत्वाने मात्र सोनिया गांधींसाठी राजस्थानची निवड केली. दरम्यान सोनिया गांधी यांनी बुधवारी सकाळी जयपुरमध्ये पोहोचल्या आणि राजस्थन विधीमंडळात उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यानंतर त्यांनी काँग्रेस आमदारांच्या बैठकीत त्यांच्याशी संवाद साधला. यावेळी सोनिया गांधी यांच्यासोबत काँग्रेसने नेते राहुल गांधी, सरचिटणीस प्रियंका गांधी, माजी मुख्यमंत्री अशोक गेहलोत, सचिन पायलट उपस्थित होते. काँग्रेस पक्ष नेतृत्वाने सोनिया गांधींना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सोनिया गांधींच्या रायबरेली लोकसभा क्षेत्रातून प्रियंका गांधी लोकसभा निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातून काँग्रेसने चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. राज्यात दोन वर्षांपुर्वी झालेल्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसमधील काही मते फुटल्याने त्यांचा पराभव झाला होता. त्या पराभवानंतर अनेक चर्चाही झाल्या होत्या. काँग्रेस नेतृत्वाने पुन्हा एकदा चंद्रकांत हांडोरे यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी केली आहे.

हे ही वाचा :

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news