Ashok Shankarrao Chavan : अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण | पुढारी

Ashok Shankarrao Chavan : अशोक चव्हाणांमुळे काँग्रेसमध्ये संशयाचे वातावरण

मुंबई : नरेश कदम : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या बंडाने राज्यातील काँग्रेस आमदारांमध्ये कमालीची अस्वस्थता असून राज्यसभेच्या निवडणुकीवरून पक्षाच्या नेत्यांची आमदारांवर करडी नजर आहे. एका महिन्यात तीन नेत्यांनी काँग्रेस सोडल्याने काँग्रेसमध्ये आता संशयाचे वातावरण आहे. (  Ashok Shankarrao Chavan )

संबंधित बातम्या 

2019 मध्ये राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या महाविकास आघाडीचे सरकार राज्यात आले. पण यातील राष्ट्रवादी आणि शिवसेना यांच्या आमदारांना मतदानासाठी फोडण्यात भाजपला यश आले होते. मात्र काँग्रेसचा एकही आमदार भाजपला फोडता आला नाही. पण लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपने अशोक चव्हाण यांना काँग्रेसमधून फोडले. त्यामुळे काँग्रेसचे आमदार अस्वस्थ झाले आहेत. (  Ashok Shankarrao Chavan )

नाना पटोलेंविरूद्धची नाराजी भोवणार

काँग्रेसमध्ये नाना पटोले यांचे नेतृत्व मान्य नसलेले अनेक आमदार आहेत. या आमदारांसाठी अशोक चव्हाण हे पक्षात आवाज उठवत होते. पक्षाचे निम्म्याहून अधिक आमदार हे अशोक चव्हाण यांना मानणारे आहेत. त्यामुळे त्या आमदारांची समजूत काढणे काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी अवघड आहे. कोणताही उमेदवार राज्यसभेसाठी काँग्रेसने दिला तरी दगाफटका होण्याची शक्यता दाट आहे. एकीकडे भाजपने आर्थिक नाकेबंदी केलेली असताना आता कोणता नेता आर्थिक रसद पक्षाला पुरविणार हाही प्रश्न आहे.

चव्हाण चौथे उमेदवार झाल्यास दगाफटका

भाजपने चौथा उमेदवार म्हणून अशोक चव्हाण यांना उभे करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे चव्हाण यांचे काँग्रेसमधील समर्थक आमदार उघडपणे मतदान करतील, असे सांगितले जात आहे. राज्यसभेसाठी पक्षाच्या प्रतिनिधीला दाखवून मतदान करावे लागते. तरीही काँग्रेसचे काही आमदार हे अशोक चव्हाण यांच्यासाठी हे धाडस करतील, अशी रणनीती आखली आहे.

थोरात, पटोले आणि पृथ्वीराज चव्हाण हे राज्यातील काँग्रेसचे प्रमुख नेते असले तरी त्यांना मर्यादा आहेत. अशोक चव्हाण यांना राज्याच्या राजकीय नकाशाचा चांगला अभ्यास आहे. आताही लोकसभेच्या जागावाटपात त्यांनीच काँग्रेसने कोणत्या जागा लढविल्या पाहिजेत, याचा आराखडा बनविला होता.

दोघांचा जाहीर पाठिंबा

काँग्रेसच्या नांदेड जिल्ह्यातील मोहन हंबर्डे आणि जितेश अंतापूरकर या दोन आमदारांनी उघडपणे अशोक चव्हाण यांना साथ देण्याचे जाहीर केले आहे. या दोघांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला नसला तरी मतदार संघातील कार्यकर्त्यांशी चर्चा करून निर्णय जाहीर करू, असे या दोघांनी स्पष्ट केले आहे.

Back to top button