Ashok Chavanच्या भाजप प्रवेशानंतर नारायण राणे, पीयूष गोयल लोकसभेच्या रिंगणात | पुढारी

Ashok Chavanच्या भाजप प्रवेशानंतर नारायण राणे, पीयूष गोयल लोकसभेच्या रिंगणात

मुंबई : पुढारी वृत्तसेवा : काँग्रेस नेते माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण  यांनी मंगळवारी भाजपात प्रवेश केल्यानंतर राज्यसभेच्या उमदेवारीची समीकरणे बदलली आहेत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि पीयूष गोयल यांना लोकसभा रिंगणात उतरवले जाणार आहे. राज्यसभेला भाजप एक जादा उमदेवार देणार आहे. अशोक चव्हाणांना राज्यसभेची उमेदवारी मिळणार आहे. ( Ashok Chavan )

संबंधित बातम्या 

नारायण राणे व अशोक चव्हाण ( Ashok Chavan ) यांचे काँग्रेसमध्ये असल्यापासून वितुष्ट होते. अशोक चव्हाणांना मुख्यमंत्री केल्याने राणेंनी त्या काळी टीकेची झोड उठवली होती. त्यानंतर तब्ब्ल 80 दिवस राणे मंत्रिमंडळाबाहेर होते. 80 दिवसांनंतर उद्योगमंत्रिपद देऊन राणेंना मंत्रिमंडळात घेण्यात आले होते.

एकेकाळचे राणेंचे काँग्रेसमधील विरोधक भाजपमध्ये आल्यामुळे राणेंनी मंगळवारी फडणवीस यांची भेट घेतली. या भेटीत राणे आणि गोयल यांना लोकसभेची उमेदवारी देण्याचा निर्णय पक्षश्रेष्ठींनी घेतल्याचे राणेंना सांगण्यात आल्याचे समजते. नारायण राणेंना रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात, तर पीयूष गोयल यांना मुंबईमधून लोकसभेची उमदेवारी दिली जाणार आहे.

भाजपच्या वाट्याला चार जागा

दरम्यान, राज्यसभेसाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे यांची नावे कायम असून यात अशोक चव्हाणांच्या नावाची भर पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आपला एक उमेदवार घेणार आहे; तर शिंदेंच्या शिवसेनेकडूनही एक उमेदवार दिला जाणार आहे. त्यामुळे भाजपच्या वाट्याला चार जागा येणार आहेत. काँगे्रसमध्ये फाटाफूट करून भाजप चौथी जागा जिंकण्याच्या तयारीत आहे.

Back to top button