Ashok Chavan Resign : नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांना टोला, म्हणाले; ‘सर्वकाही मिळालेले नेते..’ | पुढारी

Ashok Chavan Resign : नाना पटोलेंचा अशोक चव्हाणांना टोला, म्हणाले; ‘सर्वकाही मिळालेले नेते..’

पुढारी ऑनलाईन डेस्क : Ashok Chavan Resign : महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून त्यांना महाराष्ट्रातून राज्यसभेवर पाठवले जाणार असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, चव्हाण यांच्यासोबत आणखी काही आमदारही काँग्रेस पक्षाचा राजीनामा देणार आहेत अशी जोरदार चर्चा आहे. या राजकीय घडामोडीनंतर अनेक नेत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपले मत व्यक्त केले असून एक्स पोस्ट शेअर केली आहे.

नाना पटोले म्हणाले की, ‘काँग्रेस पक्षाने अनेक नेत्यांना खूप काही काही दिले आहे. आज काँग्रेस पक्ष संविधान आणि लोकशाही वाचविण्याची लढाई लढत असताना सर्वकाही मिळालेले नेते काँग्रेस पक्षाला आणि विचारधारेला सोडून जात आहेत हे दुर्देवी आहे. कोण, कशासाठी, कुठे जात आहे? हे जनता उघड्या डोळ्याने पहात आहे. आम्ही सर्व काँग्रेस पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते काँग्रेसचा विचार आणि लोकशाही वाचविण्यासाठी धर्मांध, हुकुमशाही वृत्तीच्या भारतीय जनता पक्षाविरोधात पूर्ण ताकदीनिशी लढून त्यांना पराभूत करू,’ असा निर्धार व्यक्त केला आहे. (Ashok Chavan Resign)

भाजपमध्ये जाण्याचा अजून निर्णय नाही : अशोक चव्हाण

भाजपमध्ये जाण्याचा अजून निर्णय नाही. काँग्रेसमध्ये होतो तो पर्यंत प्रामाणिकपणे काम केलं. मला कोणाबद्दल तक्रार करायची नाही. मी काँग्रेस पक्षाचा विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिलाय. यापुढे राजकीय भूमिका २ दिवसात ठरवणार, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना दिली.

पक्षाच्या अंतर्गत बाबींवर मला भाष्य करायचे नाही. कालपर्यंत मी काँग्रेसच्या बैठकीत होतो, नाराजी नाही. कोणत्याही आमदाराविषयी भाष्य करायचे नाही. मी कोणताही अद्याप घेतलेला नाही. माझा राजीनाम्याचा वैयक्तिक निर्णय आहे, कोणाचाही दबाव नाही. मी कोणत्याही नेत्यांसोबत चर्चा केलेली नाही. अशोक चव्हाणांनीही पक्षासाठी खूप केलं, असे अशोक चव्हाण यावेळी म्हणाले. (Ashok Chavan Resign)

Back to top button