Pune : बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण बचावला | पुढारी

Pune : बिबट्याच्या हल्ल्यातून तरुण बचावला

पारगाव : पुढारी वृत्तसेवा :  रांजणी (ता. आंबेगाव) येथील वाकोबा वस्तीत जनावरांना चारा आणण्यासाठी चाललेल्या आदित्य जनार्दन वाघ या तरुणावर उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला केला. तरुणाने आरडाओरडा करीत पळ काढल्याने त्याचे प्राण वाचले. शुक्रवारी (दि.9 ) सकाळी 9 च्या सुमारास ही घटना घडली. रांजणी गावाच्या दक्षिण दिशेला वाकोबा वस्ती आहे. येथील आदित्य जनार्दन वाघ (वय 19) हा तरुण नेहमीप्रमाणे शुक्रवारी (दि. 9) सकाळी 9 च्या सुमारास जनावरांसाठी चारा आणण्यासाठी चालला होता. त्याच्या शेताच्या चोहोबाजूंनी उसाचे क्षेत्र आहे. उसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने आदित्यवर हल्ला केला.

प्रसंगावधान राखून आदित्यने आरडाओरडा करत हातातील कुर्‍हाड बिबट्यावर उगारून तेथून पळ काढला. यामुळे त्याचे प्राण वाचले. मात्र, त्याच्या खांद्यावर व मानेवर ओरखडे उमटले आहेत. माजी सरपंच गोविंद वाघ यांनी वनविभागाच्या अधिकार्‍यांना संपर्क साधला. परंतु त्यांनी फोन घेतला नाही. आदित्यवर रांजणी गावात प्राथमिक उपचार करून नंतर मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचार
करण्यात आले.

वाकोबा वस्तीत पिंजरा लावण्याची मागणी
रांजणी परिसरात वाकोबा वस्तीत बिबट्याचा कायम वावर आहे. शेतकर्‍यांमध्ये कायम भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने या परिसरात त्वरित पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी माजी सरपंच गोविंद वाघ, दशरथ भोर, मनोज वाघ यांच्यासह शेतकर्‍यांनी केली आहे.

 

Back to top button