क्रीडा मार्गदर्शकांची होणार व्यावसायिक चाचणी; 80 गुणांची होणार परीक्षा | पुढारी

क्रीडा मार्गदर्शकांची होणार व्यावसायिक चाचणी; 80 गुणांची होणार परीक्षा

सुनील जगताप

पुणे : राज्यातील क्रीडा संस्कृती वाढावी… प्रत्येक खेळ प्रकारातील खेळाडुंची प्रगती होऊन राज्याला अधिकाधिक पदके मिळावीत, या हेतुने क्रीडा व युवक सेवा संचालनालयाच्या वतीने क्रीडा मार्गदर्शकांची भरती करण्यात येणार आहे. या भरतीसाठी व्यावसायिक चाचणीचे आयोजन करण्यात आले असून तब्बल सहा दिवस ही चाचणी सुरू राहणार असल्याचे वरिष्ठ अधिकार्‍यांकडून सांगण्यात आले.
क्रीडा विभागाच्या वतीने घेण्यात येणारी ही चाचणी 80 गुणांची असणार आहे.

त्यामध्ये वेगवेगळे 10 प्रकारांच्या चाचण्या असून प्रमाणपत्रांचा ही विचार केला जाणार आहे. या परीक्षेमध्ये शैक्षणिक अर्हता मूळ कागदपत्रे तपासणी करण्यात येणार आहे. 2400 मीटर धावणे, सीट अ‍ॅन्ड रीच फ्लेक्सिबिलीटी टेस्ट, सीट अप टेस्ट, उभे राहुन लांब उडी असणार आहे. खेळनिहाय कौशल्य चाचणीमध्ये क्रीडा कौशल्य करून दाखवणे, शिकवणे, खेळाचे असलेले ज्ञान, क्रीडा प्रशिक्षण क्षेत्रातील कामगिरी आणि खेळाडू म्हणून केलेली कामगिरी आदिंचा विचार या परीक्षेमध्ये केला जाणार आहे. त्यामुळे या सर्व प्रक्रियेसाठी तब्बल 312 उमेदवार क्रीडा मार्गदर्शक पदासाठी आले असून त्यामधून केवळ 56 उमेदवारांचीच निवड केली जाणार आहे.

राज्यातील विविध क्रीडा प्रकारांतील क्रीडा मार्गदर्शकांची पदे भरण्यात येणार असून या पदांसाठी शासनाच्या निर्देशाप्रमाणे व्यावसायिक चाचणींचे आयोजन केले आहे. सद्य:परिस्थितीत 56 पदांसाठी 312 मार्गदर्शकांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. येत्या सहा दिवसांमध्ये हे सर्व चाचणी पार पडणार असून त्यातून क्रीडा मार्गदर्शकांची भरती करण्यात येणार आहे.
सुधीर मोरे, सहसंचालक, क्रीडा व युवक सेवा संचालनालय

या खेळांचा आहे समावेश

क्रीडा मार्गदर्शकांच्या भरतीसाठी राज्यातील तब्बल 40 क्रीडा प्रकारांमध्ये ही भरती केली जाणार आहे. त्यामध्ये प्रामुख्याने कनोईंग कयाकिंग, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, नेमबाजी, मल्लखांब, स्क्वॅश, तलवारबाजी, व्हॉलीबॉल, मैदानी, बॅडमिंटन, बेसबॉल, खो-खो, हॅण्डबॉल, जलतरण, कराटे, सॉफ्टबॉल, क्रिकेट, धनुर्विद्या, बॉल- बॅडमिंटन, कुस्ती, बुद्धिबळ, डॉजबॉल, किक-बॉक्सिंग, नेटबॉल, लॉन टेनिस, टेबल टेनिस, वेटलिफ्टिंग, रोलर स्केटिंग, रोईंग, रग्बी फुटबॉल, स्पोर्ट्स क्लायम्बींग, तायक्वांदो, वुशू, कबड्डी, ज्युदो, योगा, बॉक्सिंग आणि जिम्नॅस्टिक या खेळांचा समावेश आहे.

हेही वाचा

Back to top button