पादचारी मार्गावरच पार्किंग; रेल्वे मुख्यालयासमोरील प्रकार | पुढारी

पादचारी मार्गावरच पार्किंग; रेल्वे मुख्यालयासमोरील प्रकार

प्रसाद जगताप

पुणे : रेल्वेच्या पुणे रेल्वे स्थानक येथील मुख्यालयासमोरील पादचारी मार्गावरच रिक्षाचालक आणि टॅक्सीचालक सर्रासपणे आपली वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे येथून जाताना पादचार्‍यांना मोठी कसरत करावी लागत आहे, याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे पहायला मिळत आहे. पुणे रेल्वे स्थानकातून दररोज हजारो प्रवाशांची ये-जा असते. त्यांना निश्चित स्थळी पोहचविण्यासाठी परिसरात रिक्षा, टॅक्सी आणि पीएमपी बसगाड्यांची सेवा आहे. मात्र, स्थानकाच्या समोरील बाजूस स्टँड असतानाही फीडर सेवा पुरविणारे रिक्षा, टॅक्सीचालक बेशिस्तपणे वागून वाहतूक कोंडीत भर घालत आहेत.

‘पिक अवर’मध्ये होते वाहतूककोंडी

रेल्वेच्या समोरील प्रवेशद्वारासह मागील बाजूसदेखील (नगर रस्ता) गेट आहे. मागच्या बाजूनेदेखील रेल्वे प्रवाशांची ये-जा असते. त्यात आता मेट्रो प्रवाशांची देखील भर पडली आहे. या प्रवाशांना सोडण्यासाठी आणि नेण्यासाठी आलेले रिक्षा, टॅक्सीचालक बेशिस्तपणे आपली वाहने पार्किंग करत आहेत, त्यामुळे पादचार्‍यांचे हाल होत आहेत. त्यासोबतच या परिसरात पीकअवरमध्ये कोंडी होत आहे.

बेशिस्तपणे नो-एन्ट्रीत घुसखोरी

रेल्वेच्या मागील बाजूच्या पार्किंगमधून बाहेर निघालेले दुचाकीचालक आणि
रेल्वे मुख्यालयामधून निघालेले दुचाकीचालक सरासर्र्पणे नो-एन्ट्रीत घुसून रस्ता क्रॉस करत आहेत. परिणामी, येथे भरधाव वाहनांमुळे मोठा अपघात होण्याची शक्यता आहे. त्यासोबतच वाहतूक कोंडीत भर पडत आहे.

रेल्वे स्थानकाच्या मागील बाजूला असलेल्या पादचारी मार्गावरून कायम ये-जा असते. त्यावेळी रिक्षा, टॅक्सीचालकांच्या गाड्या निम्म्या रस्त्यावर आणि निम्म्या पादचारी मार्गावरच लावलेल्या असतात. त्यामुळे येथून जाताना कसरत करावी लागते. खासकरून हा प्रकार रेल्वेच्या मुख्यालयासमोरच पहायला मिळतो. रेल्वे स्थानक परिसरात रिक्षा, टॅक्सी, पीएमपी बसचालकांना शिस्त लावण्याची गरज आहे.

– सागर खरात, पादचारी

हेही वाचा

Back to top button