…तर पाकिस्तानमध्ये होणार जागतिक विक्रम! पहिल्यांदाच येणार अपक्षांचे सरकार! | पुढारी

...तर पाकिस्तानमध्ये होणार जागतिक विक्रम! पहिल्यांदाच येणार अपक्षांचे सरकार!

इस्लामाबाद, वृत्तसंस्था : पाकिस्तानला ज्यांनी लुटले, कर्जबाजारी केले त्या चोरांशी आमचे सरकार कुठलीही तडजोड करणार नाही… हे 17 ऑगस्ट 2018 रोजी इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या संसदेत पंतप्रधान म्हणून काढलेले पहिलेच उद्गार! पाच वर्षांनंतर याच इम्रान खान यांना चोरीच्या गुन्ह्यात कारावासाची शिक्षा झालेली आहे. त्यांच्या तहरिक-ए-इन्साफ पाकिस्तान या पक्षाचे निवडणूक चिन्ह असलेली बॅट निवडणूक आयोगाकडून मोडून टाकण्यात आली आहे.

इम्रान यांच्यासह पक्षाचे बहुतांश बडे नेते जेलमध्ये आहेत. पक्षाच्या उमेदवारांवर अपक्ष म्हणून निवडणूक लढविण्याची वेळ आलेली आहे. अनके सर्वेक्षणांतून इम्रान यांची लोकप्रियता पाकिस्तानात वाढलेली असल्याचे रिपोर्ट आलेले आहेत. ते खरे ठरले आणि इम्रान यांचे हे अपक्ष उमेदवार बहुमताने निवडून आले, तर जगाच्या इतिहासात पहिल्यांदाच अपक्षांचे सरकार स्थापन होण्याचा विक्रम पाकिस्तानच्या नावावर नोंदविला जाईल. कर्णधार म्हणून क्रिकेट वर्ल्डकपमध्ये पाकिस्तानला पहिल्यांदाच जगज्जेतेपद मिळवून देणार्‍या इम्रान यांची सगळी हयात खरे तर छानछोकीमध्ये, चैनीत गेलेली आणि पंतप्रधान म्हणून ते स्वत:च्या देशातील जनतेला मात्र पवित्र कुराणातील धडे देऊ लागले. जग पाहिलेल्या, अनुभवलेल्या आणि भोगलेल्याही इम्रान यांचा एखाद्या धार्मिक उपदेशकाचा बाज जगाचे मनोरंजन करणारा ठरला. पाकमध्ये लोकांना आवडते म्हणून ते उगीच भारताला धमक्याही देऊ लागले. काश्मीर घेत नाही तोवर मोकळा श्वास घेणार नाही, असे सांगू लागले आणि त्यांच्याच देशातील लष्कर त्यांच्यावर उलटले. अविश्वास प्रस्ताव आला, मंजूर झाला. सरकारही गेले व इम्रान आता जेलमध्ये आहेत. तीन प्रकरणांत न्यायालयाने त्यांना शिक्षा ठोठावली आहे.

8 फेब्रुवारी 2024 रोजी पाकिस्तानमध्ये निवडणुका होणार आहेत. इम्रान यांच्या अटकेनंतर उसळलेल्या हिंसाचारामुळे इम्रान यांच्या बहुतांश उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. सध्या सत्तेत असलेल्यांसह लष्करही विरोधात आहे. त्यामुळे अटकेच्या भीतीने ते प्रचारासाठी घराबाहेरही पडू शकत नाहीत, अशी स्थिती आहे. निवडणुकांना नियोजित वेळेहून 4 महिने उशीर झालेला आहे. सध्या सत्तेत असलेल्या आघाडीतील नवाझ शरीफ यांचा पक्ष पाकिस्तान मुस्लिम लीग-एन आणि बिलावल भुट्टो यांचा पक्ष पाकिस्तान पीपल्स पार्टीने आपापले उमेदवार उभे केलेले आहेत. प्रचारही सुरू केला आहे. या दोन्ही पक्षांचे नेते प्रचारात गुंतलेले असताना दोन दिवसांतील दोन न्यायालयीन निर्णयांनी इम्रान यांना 24 वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. या शिक्षेनंतर इम्रान खान 10 वर्षे कोणतेही सरकारी पद भूषवू शकत नाहीत. त्यांच्या पक्षाचे नेते तसेच माजी परराष्ट्र मंत्री शाह मेहमूद कुरेशी यांना 10 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

इम्रान खान यांना कुठल्या प्रकरणांत किती कारावास?

तोशाखाना केस
निकाल : 5 ऑगस्ट 2023
शिक्षा : 3 वर्षे कारावास

सायफर केस
निकाल : 30 जानेवारी 2024
शिक्षा : 10 वर्षे कारावास

तोशाखाना रेफरन्स
निकाल : 31 जानेवारी 2024
शिक्षा : 14 वर्षे कारावास

इम्रान यांचा राजकीय प्रवास

25 एप्रिल 1996 रोजी इम्रान यांनी तहरिक-ए-इन्साफ पाकिस्तान या पक्षाची स्थापना केली.

1999 मध्ये परवेझ मुशर्रफ यांच्या लष्करी बंडाला इम्रान यांनी पाठिंबा दिला. ते पक्षाचे एकमेव विजयी उमेदवार होते.

2008 मध्ये निवडणुका झाल्या तेव्हा मुशर्रफ यांच्याविरोधात इम्रान यांनी उमेदवारच उभे केले नाहीत.

2013 च्या निवडणुकीत इम्रान यांनी 28 जागांवर विजय मिळविला.

2018 मध्ये (270 पैकी 116 जागा जिंकल्या होत्या)
पंतप्रधान झाले.

9 मे 2023 नंतर इम्रान खान यांचे चक्र उलटे फिरू लागले व आता ते जेलमध्ये आहेत.

तोशाखाना प्रकरण काय?

तोशाखाना या फारसी शब्दाचा अर्थ सम्राटांना मिळालेल्या भेटवस्तू ठेवण्याची खोली.
1974 मध्ये पाकमध्ये तोशाखाना निर्मिती झाली.
पंतप्रधानांना विदेशी मान्यवरांकडून मिळालेली प्रत्येक भेटवस्तू 30 दिवसांत तोशाखान्यात जमा करण्याचा कायदा 1978 मध्ये झाला.
2018 ते 2021 दरम्यान पंतप्रधान म्हणून इम्रान यांना मिळालेल्या भेटवस्तू त्यांनी तोशाखान्यात जमा न करता परस्पर विकल्या.
निवडणूक आयोगाला इम्रान यांनी सांगितले की, त्यांनी तोशाखान्यातून या सर्व वस्तू 2.15 कोटींत विकत घेतल्या होत्या. पुनर्विक्रीतून त्यांना 5.18 कोटी मिळाले. प्रत्यक्षात मात्र इम्रान यांना 20 कोटींवर रक्कम यापोटी मिळाली होती.

5 फेब्रुवारी रोजी अंतर्गत निवडणुका

सार्वत्रिक निवडणुकीच्या 3 दिवस आधी 5 फेब्रुवारी रोजी तहरिक-ए-इन्साफ पाकिस्तानच्या पक्षांतर्गत निवडणुका होणार आहेत. राष्ट्रीय अध्यक्षांसह सर्व प्रदेश अध्यक्षांची निवड यात केली जाणार आहे.

हेही जाणून घ्या…

इम्रान खानवर 180 हून अधिक खटले दाखल केले आहेत.
सर्व खटले जलदगती न्यायालयात सुरू आहेत.
इम्रान यांच्या पक्षाची कमान सध्या बॅरिस्टर गौहर अली खान यांच्याकडे आहे.

इम्रान यांच्या पक्षातील कैदेत असलेले बडे नेते

शाह मेहमूद कुरैशी, चौधरी परवेज इलाही, फारुख हबीब, हलीम शेख, हसन खान नियाझी, असद उमर, अली मोहम्मद खान, फिरदौस शमीम नक्वी, एजाझ चौधरी, शहरयार खान आफ्रिदी

Back to top button