बिबट्यांवर आता आमदारांचा ‘वॉच’ | पुढारी

बिबट्यांवर आता आमदारांचा ‘वॉच’

शशिकांत पवार

नगर तालुका : राज्यातील नऊ जिल्ह्यांमध्ये बिबट्यावर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी आमदारांवर सोपविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हाच पॅटर्न नगर जिल्ह्यात राबविण्याची गरज निर्माण झाली आहे. बिबट्यांचे संरक्षण तसेच मानवांवर होणारे हल्ले रोखण्यासाठी वन विभागाकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना ‘सपोर्ट’ म्हणून हा पॅटर्न यशस्वी होऊ शकतो.

नगर जिल्ह्याला मोठी निसर्गसंपदा लाभलेली आहे. तसेच उत्तरेतील तालुक्यांमध्ये उसाचे क्षेत्रदेखील अधिक आहे. त्यामुळे जिल्ह्यात बिबट्यांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येते. शेकडो बिबट्यांचे वास्तव्य गर्भगिरीच्या डोंगररांगांनी तसेच उसाच्या क्षेत्रात आढळून येत आहे. मानवांवर हल्ला करण्याच्या घटनादेखील वाढतच आहेत. बिबट्याच्या हल्ल्यात मुले, शेतकरी यांना आपले प्राण गमावले लागलेे आहेत, तर अनेक जण जखमी झाले आहेत. कुत्र्यांसह शेतकर्‍यांच्या दुभत्या जनावरांच्या शिकारीच्या घटनांची संख्या तर लक्षणीय वाढलेली आहे.

बिबट्यांचे संरक्षणदेखील गरजेचे आहे. मानव वस्ती तसेच शहरालगत बिबट्यांचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये दहशत निर्माण होत आहे. तसेच बिबट्यांच्या जीविताला देखील धोका निर्माण झालेला आहे. रस्ते अपघात, विहिरीत पडल्याने तसेच रानडुकरांच्या संरक्षणासाठी लावलेल्या तारेच्या कंपाऊंडमध्ये अडकून, विजेचा शॉक लागून बिबट्यांचा मृत्यू होण्याच्या घटना चिंताजनक आहेत. या सर्व बाबींचा विचार करून सरकारने राज्यातील नऊ जिल्ह्यांमधील पंधरा आमदारांवर बिबट्यावर ‘वॉच’ ठेवण्याची जबाबदारी सोपवली आहे. हे सर्व आमदार बिबट्यांना जेरबंद करण्यासाठीचा आराखडा व नियोजन वनविभागाला सांगतील.

वाघांचे संगोपन आणि संवर्धनासाठी राज्यात सध्या सात व्याघ्र प्रकल्प आणि 42 अभयारण्य आहेत. मात्र बिबट्यांची संख्या राज्यात मोठ्या संख्येने वाढली आहे. जंगल अपुरे पडत असल्याने बिबट्यांची धाव शहर, ग्रामीण भागातील मानवी वस्तीत राजरोसपणे सुरू आहे. नगर जिल्ह्यात पट्टेरी वाघ आढळत नसले तरी बिबट्यांची संख्या मात्र खूपच वाढल्याचे दिसून येते. बिबट्यांच्या नसबंदीची मागणी देखील काही आमदार-खासदारांकडून करण्यात आली होती; पण त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आलेला नाही.

मानवी वस्तीत बिबट्यांची वाढलेली सैर, बालकांचे बिबट्याच्या हल्ल्यात होत असलेले मृत्यू, याचबरोबर बिबट्यांच्या जीविताला निर्माण झालेला धोका यावर मात करण्यासाठी इतर नऊ जिल्ह्यांत सुरू करण्यात आलेला ‘पॅटर्न’ नगर जिल्ह्यात राबविण्याची गरज आहे. सत्ताधारी तसेच विरोधी पक्षातील 15 आमदारांवर बिबट्यावर वॉच ठेवण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. हाच पॅटर्न मोठ्या प्रमाणात बिबट्यांची संख्या असलेल्या नगर जिल्ह्यात यशस्वी होऊ शकतो.

या आमदारांवर जबाबदारी

नागपूर – समीर कुणावर, आशिष जयस्वाल
अमरावती – संजय कुटे
यवतमाळ – अशोक उईके, मदन येरावार
गडचिरोली – कृष्णा गजबे
चंद्रपूर – प्रतिभा धानोरकर
कोल्हापूर – अनिल बाबर, प्रकाश आबिटकर, जयंत पाटील, मानसिंग नाईक
पुणे – अतुल बेनके, अशोक पवार
ठाणे – सुनील प्रभू
नाशिक – दिलीप बनकर

मुबलक पाणी, अधिवासाला अनुकूल वातावरण, बिबट्यांचे वाढते प्रजनन, उसाचे क्षेत्र यामुळे बिबट्यांच्या संख्येत वाढ होत आहे. नगर जिल्ह्यात बिबट्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात आढळून येते. बिबट्यांवर वॉच ठेवण्याची जबाबदारी स्थानिक लोकप्रतिनिधींवर दिली तर वनविभागाला मदतच होईल.
       – ज्योती तोडमल, सरपंच तथा अध्यक्ष वन व्यवस्थापन समिती, जेऊर

Back to top button