तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार : मुख्यमंत्री शिंदे | पुढारी

तीन लाख कारागिरांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणणार : मुख्यमंत्री शिंदे

मुंबई; पुढारी वृत्तसेवा : पारंपरिक कारागीर आणि हस्तकलेला ओळख प्राप्त करून देणारी पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात सुरू केली आहे. महाराष्ट्र या योजनेतही अग्रेसर राहील, असा विश्वास वाटतो. या योजनेअंतर्गत 2028 पर्यंत तीन लाख कारागिरांना विकासाच्या प्रवाहात आणणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी केले. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य योजनेंतर्गत राज्यातील 101 केंद्रांच्या आरंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह शासकीय अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले, पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेतून राज्यात नवनवीन स्टार्टअपही सुरू व्हावेत. या स्टार्टअपनी जागतिक स्पर्धेत उतरावे. पी. एम. विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजेनेच्या पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांतील 101 तुकड्यांना खास प्रशिक्षण दिले जाणार आहे. आगामी काळात अन्य जिल्ह्यांतही या प्रशिक्षणाचा विस्तार करण्यात येईल आणि त्यास सर्वतोपरी पाठबळ दिले जाईल.

कुशल मनुष्यबळ निर्माण करणार : मंत्री लोढा

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, कौशल्य विकास विभाग राज्यात जास्तीत जास्त कुशल मनुष्यबळ विकसित करण्यावर भर देत असून, राज्यात 511 प्रमोद महाजन कौशल्य विकास केंद्रे सुरू झाली आहेत. आता पी. एम. विश्वकर्मा सन्मान योजना 15 जिल्ह्यांत 101 ठिकाणी सुरू करत आहोत. यापुढे ही संख्या वाढविण्यात येईल. नमो महारोजगार मेळाव्यातून अधिकाधिक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊन प्रत्येक हाताला काम देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे.
या लाभार्थ्यांना 5 दिवसांचे कौशल्य विकास प्रशिक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थ्यांना संबंधित व्यवसायाच्या टूलकिटसाठी 15 हजार रुपयांचे ई-व्हाऊचर विद्यावेतन देण्यात येणार आहे. प्रशिक्षणानंतर पात्र लाभार्थ्यांना 5 टक्के व्याज दराने एक लाखाचे कर्जही दिले जाणार आहे.

योजनेची प्रमुख वैशिष्ट्ये

प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल्य सन्मान योजनेंतर्गत अठरा व्यवसायांचा समावेश आहे. सुतार, होड्या बनवणारे, हत्यारे बनवणारे, लोहार, टाळा बनवणारे, हातोडा आणि टूलकिट बनविणारे, सोनार, कुंभार, मूर्तिकार, चांभार, मेस्त्री, चटई आणि झाडू बनवणारे, पारंपरिक बाहुल्या आणि खेळणी बनवणारे, नाभिक, हार बनवणारे, धोबी, शिंपी, माशाचे जाळे विणणार्‍या कारागिरांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

Back to top button