‘कोयना’ सिंचनामुळे वीजनिर्मितीला फटका बसणार | पुढारी

‘कोयना’ सिंचनामुळे वीजनिर्मितीला फटका बसणार

गणेशचंद्र पिसाळ

पाटण :  कोयना धरणात अपेक्षित पाणीसाठा शिल्लक असला तरी यावर्षी धरणासह राज्यातही कमी पडलेला पाऊस व पाणीटंचाई लक्षात घेता येथे वीजनिर्मितीपेक्षा सिंचनाला प्राधान्य मिळाले आहे. या तांत्रिक वर्षात डिसेंबर 2023 अखेर झालेली तुलनात्मक जादा वीजनिर्मिती जानेवारीअखेर कमी झाल्याची तांत्रिक आकडेवारी आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी लवादाचा आरक्षित कोटा यावर्षी पूर्णपणे वापरला जाणार की पश्चिम वीजनिर्मितीला कात्री लागणार याचा विचार महत्त्वाचा आहे. शासन, प्रशासनाने कोयनेच्या तांत्रिक अडचणी लक्षात घेता राज्याला भारनियमन मुक्त व अंधारातून बाहेर काढायचे असेल तर पर्यायी विजेची आतापासूनच व्यवस्था करणे सार्वत्रिक हिताचे ठरणार आहे.

चालू तांत्रिक वर्षात कोयना धरणातील पाण्याबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले किंवा होणार असले तरी आतापर्यंत झालेल्या आठ महिन्यांत याच पाण्यावर 1614.899 मेगावॅट वीजनिर्मिती झाली आहे. गतवर्षीच्या तुलनेत आतापर्यंत 65.952 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. यावर्षी पाणीटंचाई लक्षात घेता सिंचनासाठी प्राधान्यक्रम दिल्याने कोयनेच्या पश्चिम जलविद्युत निर्मिती प्रकल्पांसाठी लवादाच्या आरक्षित पाणी कोट्यावर मर्यादा येण्याच्या दाट शक्यता आहेत.

या तांत्रिक जलवर्षात आठ महिन्यांत कोयना जलविद्युत प्रकल्पात पश्चिमेकडे 33.66 टी.एम.सी. पाण्यावर 1536.489 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली . गतवर्षी 34.86 टी. एम. सी. वर 1600.343 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती .यावेळी तुलनात्मक पश्चिमेकडे 1.20 टीएमसी पाणीवापर कमी झाला असून 63.854 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे. पूर्वेकडे कोयना धरण पायथा वीजगृहातून वीजनिर्मिती करून ते पाणी सिंचनासाठी कोयना नदीपात्रात सोडण्यात येते. आतापर्यंत सिंचनासाठी सोडलेल्या 15.34 व पूरकाळात 2.52 अशा 17.86 टी.एम.सी. पाण्यावर 78.410 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली. गतवर्षी सिंचन व पूरकाळातील सोडलेल्या 21.88 टी.एम.सी. पाण्यावर 80.508 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. तुलनात्मक यावर्षी 4.02 टी.एम.सी.पाणीवापर कमी झाल्याने 2.098 दशलक्ष युनिट कमी वीजनिर्मिती झाली आहे.

चारही जलविद्युत प्रकल्पांचा विचार करता आतापर्यंत एकूण 51.22 टी. एम. सी.पाण्यावर 1614.899 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली.
गतवर्षी 56.74 टी.एम.सी.पाण्यावर 1680.851 दशलक्ष युनिट वीजनिर्मिती झाली होती. गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी एकूण 5.52 टीएमसी पाणीवापर कमी झाल्याने 65.952 दशलक्ष युनिट जादा वीजनिर्मिती झाली आहे. पश्चिम वीजनिर्मितीसाठी वर्षभरात 67.50 टीएमसी पाणी लवादाचा आरक्षित कोटा आहे. धरण निर्मितीनंतर सन 2021 साली ऐतिहासिक 82.64 टीएमसी पाणी पश्चिम वीजनिर्मितीसाठी वापरले गेले होते. आगामी चार महिन्यांसाठी पश्चिम वीजनिर्मितीसाठी लवादाचा 33.84 टीएमसी पाणीकोटा शिल्लक आहे.

Back to top button