Satara Accident : देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात आजोबासह नातू ठार, ५ जखमी | पुढारी

Satara Accident : देवदर्शनासाठी जाताना कुटुंबावर काळाचा घाला; अपघातात आजोबासह नातू ठार, ५ जखमी

कण्हेर; पुढारी वृत्तसेवा : मेढा-सातारा रस्त्यावरील हामदाबाज (ता. सातारा) येथील फाट्यावर कार संरक्षक कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात अवघा 3 महिन्यांचा नातू व आजोबा ठार झाले. या दुर्घटनेत एकाच कुटुंबातील पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. पाली येथे देवदर्शनासाठी जाताना गुरुवारी दुपारी पावणेएकच्या सुमारास या कुटुंबावर काळाने घाला घातला.

नामदेव पांडुरंग जुनघरे (वय 55, रा. सावली, ता. जावली) व त्यांच्या मुलीचा 3 महिन्यांचा मुलगा आद्विक अमर चिकणे (रा. गांजे ता. जावली) या दोघांचा या अपघातात मृत्यू झाला, तर सुवर्णा नामदेव जुनघरे (वय 48), प्रसाद नामदेव जुनघरे (वय 26), आरती नामदेव जुनघरे (वय 24) (सर्व रा. सावली-मेढा), तसेच पूजा अमर चिकणे (वय 27), अन्वी अमर चिकणे (वय 4, रा.गांजे, ता.जावली) अशी जखमींची नावे आहेत. नामदेव जुनघरे हे मेढा येथील शिक्षक बँकेत कार्यरत असून बँकेस साप्ताहिक सुट्टी असल्याने ते कुटुंबियांसमवेत पाली येथे देवदर्शनासाठी निघाले होते.

जुनघरे कुटुंबिय कार (नं. एमएच02 बीपी 3097) मधून मेढ्याहून पालीच्या खंडोबाच्या दर्शनासाठी निघाले होते. घरातून बाहेर पडल्यानंतर अवघ्या 15 ते 20 मिनिटाच्या अंतरावरच सुमारे पावणे एकच्या सुमारास हा भीषण अपघात घडला. चालक प्रसाद जुनघरे यांचे भरधाव कारवरील नियंत्रण सुटल्याने ती हामदाबाज फाट्यावर रस्त्यालगतच्या कठड्यावर जावून धडकली. यात कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. शेजारी बसलेले नामदेव जुनघरे हे गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू पावले तर त्यांच्या मुलीच्या अवघ्या 3 महिन्याच्या आद्विक या बाळाचाही या दुर्घटनेने बळी घेतला. अपघाताची नोंद तालुका पोलिस ठाण्यात झाली असून अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल किशोर वायदंडे करत आहेत.

Back to top button