Parbhani News : पूर्णा साखर कारखान्याची ऊसतोड यंत्रणा कोलमडली | पुढारी

Parbhani News : पूर्णा साखर कारखान्याची ऊसतोड यंत्रणा कोलमडली

पूर्णा, पुढारी वृत्तसेवा: यंदाच्या गळीत हंगामात वसमतनगर येथील पूर्णा साखर कारखान्याची ऊसतोड यंत्रणा कोलमडल्याने ऊस उत्पादक शेतक-यांतून संताप व्यक्त केला जात आहे. कारखान्याकडे काही हार्वेस्टर ऊसतोड यंत्र आणि ट्रक, ट्रॅक्टरवरील ऊसतोड टोळ्या नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यातील कार्यक्षेत्रात कार्यरत आहेत. परंतु, तोकड्या ऊसतोड टोळ्यामुळे पूर्णा तालुका क्षेत्रात ऊस बारा तेरा महिन्याचा झाला तरी उसाची तोड झालेली नाही. Parbhani News

गट कार्यालयात, शेतकी अधिकारी, ओव्हरसीयर, कृषी मदतनीस यांच्याकडे चकरा मारुनही टोळ्या मिळत नाहीत. सध्या फूल रिकव्हरीला आलेल्या शेतात तोडणीच्या प्रतिक्षेत उभ्या असलेल्या उसाला डोळ्यावर मोडे फुटून ऊस फडावल्याचा दिसू लागला आहे. त्यामुळे अधिका-यासह ओव्हरसीयर, कृषी मदतनीस व स्लिप बाय यांना शेतकऱ्यांच्या रोषाला समोरे जावे लागत आहे. Parbhani News

जे सभासद नाहीत, असे काही शेतकरी हुशारीने जे सभासद आहेत, अशाच्या नावे ऊस तोड करुन त्यांच्या नावे ऊसतोड करून ऊस गाळपासाठी देत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. त्यामुळे सभासद शेतक-यांच्या ऊसाला वेळेत टोळी मिळत नाही. वजन वापरून ऊस टोळ्या मर्जीतल्या शेतकऱ्यांना दिल्या जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून होऊ लागला आहे. काही गावात गतवर्षी ८ व्या महिन्यात लागवड केलेला ऊस तोडणी झाल्याचे कारखाना सुत्राकडून बोलले जाते.तर शेतकरी सांगतात की आमचा ८ व ९ व्या महिन्यातील ऊस अजून ऊसतोड झाला नाही. वारंवार विनंत्या करुनही टोळी मिळत नाही. यामुळे काही ऊस उत्पादक सभासद शेतकरी कंटाळून इतर साखर कारखान्यास ऊस घालीत आहेत. त्यामुळे पूर्णा कारखान्याच्या शेतकी अधिका-यांनी यात लक्ष घालून ऊसतोड करण्याची मागणी शेतकऱ्यांतून होत आहे.

ऊस लागवड करून आजघडीला १३ महिने झाले आहेत. शेतकी अधिकारी आणि कर्मचा-यांना वारंवार विनंती करुनही अद्याप ऊसतोड टोळी दिली जात नाही. मुद्दाम टाळाटाळ केली जात आहे. कारखान्याच्या नियोजनशून्य कारभारामुळे उसाला फडे फुटून वजन घटण्याची शक्यता आहे. त्यामुळे आर्थिक नुकसान होत आहे. याबाबत कारखान्याच्या व्यवस्थापनाकडे तक्रार करणार आहे.

– अर्जुन कोंडिबा सोनटक्के, ऊस उत्पादक शेतकरी (गौर, ता.पूर्णा)

हेही वाचा 

Back to top button