‘विराट कोहली-राहुल द्रविड जोडी जमणार कारण द्रविड…’ | पुढारी

'विराट कोहली-राहुल द्रविड जोडी जमणार कारण द्रविड...'

पुढारी ऑनलाईन डेस्क

रोहित शर्मा – राहुल द्रविड जोडीने आपल्या पहिल्याच टी २० मालिकेत न्यूझीलंडला क्लीन स्विप दिला. त्यानंतर आता कसोटी मालिकेत विराट कोहली-राहुल द्रविड ही जोडी कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. जरी विराट कोहली पहिली कसोटी खेळणार नसला तरी मुंबईतील वानखेडेमध्ये होणाऱ्या दुसऱ्या कसोटी सामन्यात तो संघात परतणार आहे. तसेच तो त्या कसोटीचे नेतृत्वही करणार आहे. पहिल्या कसोटीत विराटच्या अनुपस्थितीत अजिंक्य रहाणे भारतीय संघाचे नेतृत्व करेल.

विराट कोहली आणि माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांची जोडी चांगलीच जमली होती. या जोडीने कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय संघाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले. मात्र आता रवी शास्त्रींचा प्रशिक्षक पदाचा कार्यकाळ संपला आहे. भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड आता भारताचा प्रशिक्षक झाला आहे. त्यामुळे कोहली आणि द्रविड ही जोडी येत्या काळात कशी कामगिरी करणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. विराट कोहली हा आक्रमक स्वभावाचा आहे तर द्रविड हा शांत संयमी वृत्तीचा आहे. त्यामुळे हे कॉम्बिनेशन कसे वर्क होणार याबाबत शंका व्यक्त केली जात आहे.

मात्र भारताचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाण याने वेगळे मत नोंदवले. त्याच्या मते विराट कोहली आणि राहुल द्रविड ही जोडी देखील हिट ठरणार आहे. इरफान पठाणने एका क्रीडा वाहिनीवर झालेल्या चर्चात्मक कार्यक्रमात सांगितले की, ‘कोहली आणि द्रविड यांची नवीन पार्टनरशिप, विशेषकरुन कसोटी क्रिकेटमध्ये सुरु होत आहेत. मला या भागीदारीत कोणताही समस्या दिसत नाही. कारण, राहुल द्रविड हा असा व्यक्ती आहे जो सिस्टममध्ये सामावून जातो. तो सिस्टम बदलण्याचा प्रयत्न करत नाही.’

विराट कोहली – राहुल द्रविड : राहुल अडथळे निर्माण करत नाही

पठाण पुढे म्हणाला की, ‘नक्कीच तो तांत्रिकता आणि रणनीतीवर भर देणारा व्यक्ती आहे. पण, तो कोणत्याही गोष्टीत अडथळे आणत नाही. तो कर्णधार असतानाही अडथळे निर्माण होईल असे काही करत नव्हता. तो नेहमी खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्यावर भर देतो.’

इरफानच्या मते कसोटीत विराट कोहली आणि द्रविड यांच्यात चांगला समन्वय निर्माण होईल याची संघातील वरिष्ठ आणि युवा खेळाडूंनाही मदत होईल. ‘एक गोष्ट नक्की आहे की या भागीदारीत चांगला समन्वय आणि संवाद असणार आहे. याचबरोबर संघातील वरिष्ठ खेळाडूंबरोबरच युवा खेळाडूंनाही तितकेच महत्व मिळेल.’ असे इरफान पठाण म्हणाला.

राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या इरफान पठाणने राहुल द्रविडची मानसिकता ही युवा खेळाडूंना संघात योग्यप्रकारे समावून घेण्यावर भर देण्याची असते असे सांगितले. तो म्हणाला ‘मी असं म्हणत नाही की हे यापूर्वी झालेलं नाही. पण, मी राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली खेळलो आहे. जर संघात एक युवा खेळाडू असेल तर त्याला राहुल द्रविडच्या मानसिकतेमुळे संघात सामावून घेण्यात कोणतीही अडचण येत नव्हती.’

हेही वाचा : 

Back to top button