Pudhari Crime Diary : पत्नीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याचं संशयाचं भूत! अन् चौघांच्या आयुष्याची राखरांगोळी | पुढारी

Pudhari Crime Diary : पत्नीसोबत मित्राचे प्रेमसंबंध असल्याचं संशयाचं भूत! अन् चौघांच्या आयुष्याची राखरांगोळी

विठ्ठल हेंद्रे, सातारा

संशयाचे भूत मानगुटीवर बसले की काय होऊ शकते याचा नेम नाही. संशयाच्या भुतामुळे सातार्‍यातही 2018 मध्ये एक हादरवून सोडणारी घटना घडली. स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणार्‍या युवकाचा खून झाल्याने सारेच हादरून गेले. अखेर पोलिसांच्या तपासात आरोपीच्या पत्नीसोबत मृताचे प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून हा खून झाल्याचे समोर आले. संशयाच्या अविचाराने चौघांच्या आयुष्याची राखरांगोळी झाली. (Pudhari Crime Diary)

जीवाभावाचे भाऊ-मित्र!

नितेश आणि वैभव हे दोघे एकाच गावचे, एकाच भावकीतले आणि समवयस्क! त्यामुळे दोघांची गट्टी लहानपणापासूनच होती. वैभवला शाळा फारशी जुळत नव्हती. त्यामुळे वयात येताच कुटुंबीयांनी त्याचे लग्न लावले. नितेशचे मात्र पदवी पूर्ण करून स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी व्हायचे लक्ष्य होते. नितेश आणि वैभवच्या वाटा वेगवेगळ्या असल्या तरी त्यांच्यामधील मैत्रीचा ओलावा कायम होता. नितेश गावी गेला की वैभवला हमखास भेटायचाच. लग्न झाले तरी दोघांमधील मैत्री अतूट होती. (Pudhari Crime Diary)

संशयाची सुई

नितेश वैभवला भेटायला आला की, तो घरी मनमोकळेपणाने वावरायचा. यातूनच वैभवच्या पत्नीसोबतही त्याचे बोलणे व्हायचे. वारंवार भेटीमुळे दोघेही मनमोकळेपणाने गप्पा मारायचे. वर्षभरात मात्र वैभवला हे खटकू लागलं. आपल्या पत्नीसोबत नितेश ज्यादाच बोलतोय, यातून त्याला त्याचा राग येऊ लागला. नितेश गावी आल्यानंतर वैभव त्याला भेटायच टाळू लागला. फोन बंद लागणे, रानात आज काम आहे. नंतर भेटू, अशी कारणं वैभवकडून येऊ लागली. असे असतानाही वैभव घरी भेटेल या हेतूने नितेश जायचाच. नितेश परस्पर घरी येत असल्याने वैभव अधिकच संतापला. त्यातूनच नितेशचा काटा काढायचा असा विचार वैभवच्या मनात घोळू लागला.

खुनाच्या दिवशी वैभवने पत्नीला दुचाकीवर घेतले आणि थेट सातारा गाठले. नितेशला स्पर्धा परीक्षा केंद्रातून बाहेर बोलावले. आपण तिघेजण एकांत ठिकाणी बोलू, असे म्हणत नितेशला दुचाकी चालवायला सांगितली. वैभवने दुचाकी गावी घ्यायला सांगितली. सायंकाळच्या वेळी रानातील झोपडीवजा शेडमध्ये तिघे बसले. पत्नीला बाहेर थांबण्यास सांगून पिसाळलेल्या वैभवने नितेशचा गळा आवळला आणि क्षणात त्याचा मुडदा पाडला. त्याने लागलीच हा प्रकार पत्नीला सांगून तिला तिथून जायला सांगितले.

क्राईम पार्टनर

नितेशचा खून केल्यानंतर वैभवने त्याचा मित्र राकेशला बोलावून घेतले. वैभवने थंड डोक्याने जे काही केले ते सांगून नितेशचा अपघातात मृत्यू झाला आहे, असे दाखवूया अशी योजनाही सांगितली. नितेशचा मृतदेह उचलून तो दुचाकीवर दोघांच्या मध्ये ठेवला. रानातून आडवाटेने जात असताना दुचाकी थांबवून वैभवने एक दगड नितेशच्या डोक्यात घातला आणि डोके फोडले. तो गतप्राण झाल्याची खातरजमा करत रस्त्याच्या बाजूला त्याचा मृतदेह टाकला. यानंतर वैभव व राकेश स्पर्धा परीक्षा केंद्राच्या पार्किंगमध्ये नितेशने लावलेल्या दुचाकीजवळ गेले. ती दुचाकी घेतली व पुन्हा नितेशच्या मृतदेहाजवळ अपघात झाल्यासारखे भासवून दुचाकी खाली पाडून ठेवली.

मातीवरून संशय

सातारा तालुका पोलिसांना अपघाताबाबतची माहिती मिळाल्याने ते स्पॉटवर गेले. घटनास्थळी असणार्‍यांपैकी पोलिस महेंद्र पाटोळे यांनी पंचनामा केला असता त्यांना अपघात की घातपात अशी शंका आली. पोलिसांचा तपास सुरू असताना घटनास्थळी परिसरात असलेली माती व मृतदेहाला लागलेली माती ही वेगळी असल्याचे स्पष्ट झाले. मृतदेह ज्या अवस्थेत पडला होता व डोक्याला जिथे दुखापत झाली होती ती बाजू विरुद्ध दिशेला होती. त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला.

खुनाचा पर्दाफाश

पोलिसांनी खुनाच्या दिशेने तपासाला सुरुवात केल्यानंतर स्पर्धा परीक्षा तसेच नितेशला घेऊन जाताना अशा दोन ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज मिळाले. वैद्यकीय अहवाल, घटनास्थळी दोन वेगवेगळे सापडलेले मातीचे नमुने, तांत्रिक पुरावे या आधारे वैभव, त्याची पत्नी व राकेशची पोलिसांनी उचलबांगडी केली. पोलिसांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली; मात्र तिघांनीही आपला स्टँड ठरवून घेतला होता. यातून पोलिसांना सुरुवातीला काहीच सापडले नाही. त्यामुळे खून की अपघात असा गुंता वाढत होता. यानंतर पोलिसांनी पुन्हा एकदा राकेश व वैभवच्या पत्नीला वेगवेगळे चौकशीला घेऊन उलट-सुलट प्रश्न विचारून दोघांना धारेवर धरले. यावेळी मात्र दोघांच्या बोलण्यात विसंगती आढळल्याने पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर दोघांनीही गुन्ह्याची कबुली दिली. यानंतर पोलिसांनी वैभवकडे मोर्चा वळवला. आपली पत्नी व मित्राने कबुली दिल्याचे सांगताच त्यानेही प्रेमसंबंधाच्या संशयातून कट करून नितेशचा खून केल्याची कबुली दिली.

हेही वाचा :

Back to top button