यूट्यूबरने 10 जणांना वाटले प्रत्येकी 20 लाख! | पुढारी

यूट्यूबरने 10 जणांना वाटले प्रत्येकी 20 लाख!

न्यूयॉर्क : या जगात श्रीमंतांची इतकी कमतरता नाही. पण, याहून महत्त्वाचे म्हणजे ते आपल्या पैशाचा विनियोग कसा करतात, हे आहे. मिस्टर बिस्ट हादेखील असाच एक श्रीमंत यूट्यूबर. पण, त्याने आपल्या औंदार्याचा उत्तम दाखला देत असताना चक्क 10 अज्ञात लोकांना थोडेथोडके नव्हे तर चक्क प्रत्येकी 20 लाख रुपयांची रक्कम दान केली आहे. काहीच दिवसांपूर्वी आधुनिक काळातील दानशूर कर्ण म्हणावे, अशा या बिस्टने एका वेटरला आलिशान कारची भेट देत सर्वांचे लक्ष वेधले होते.

एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर व्हिडीओ पोस्ट केल्यानंतर त्यामधून जे उत्पन्न बिस्टला मिळते, त्यातून तो हा दानधर्म करत असतो. आश्चर्य वाटेल. पण, या बिस्टला एकदा पोस्ट केलेल्या एकाच व्हिडीओसाठी थोडेथोडके नव्हे तर चक्क 2.79 कोटी रुपयांची कमाई प्राप्त झाली होती. या व्हिडीओला 20 कोटींहून अधिक व्ह्यूज मिळाले होते.

मिस्टर बिस्टचं खरे नाव जिमी डोनाल्डसन आहे. वयाच्या अवघ्या 25व्या वर्षी तो जगातील सर्वांत प्रसिद्ध यूट्यूबर बनला आहे. यूट्यूबवर त्याचे ‘मिस्टर बीस्ट’ हे चॅनेल असून, त्याचे 23 कोटी 40 लाख सबस्क्रायबर्स आहेत. याशिवाय तो आणखी चार यूट्यूब चॅनेल्सदेखील चालवतो.

आता इतके व्ह्यूज मिळवण्यासाठी बिस्टने जी शक्कल लढवली, ती अफलातून होती. मिस्टर बिस्टने यावेळी असे जाहीर केले की, मिळणार्‍या उत्पन्नातून माझ्या फॉलोअर्सपैकी 10 जणांना प्रत्येकी 20 लाख रुपये देणार आहे. साहजिकच, हा व्हिडीओ पाहता पाहता व्हायरल झाला आणि यातून बिस्टने 10 जणांची निवड केली.

साऊथ चायना मॉर्निंग पोस्टच्या वृत्तानुसार, ही बातमी एका चिनी सोशल मीडिया साईटवरही बरीच व्हायरल झाली. अनेक इन्फ्लुएन्सरनीही व्हिडीओ शेअर केला व त्यांच्या फॉलोअर्सना स्पर्धेमध्ये सहभागी होण्यास सांगितले होते. मिस्टर बिस्टचा व्हिडीओ 35 लाखांहून अधिक वेळा रिपोस्ट झाला व 21 लाखांहून अधिक लाईक्स त्याला मिळाले. त्यानंतर व्हिडीओमधून मिळणारे उत्पन्न बिस्ट यांनी अज्ञात 10 व्यक्तींना वाटून टाकले आहे.

Back to top button