नव्या प्रकारच्या लाल तार्‍याचा शोध | पुढारी

नव्या प्रकारच्या लाल तार्‍याचा शोध

लंडन : खगोलशास्त्रज्ञांनी नव्या प्रकारच्या महाकाय लाल तार्‍याचा (रेड जायंट स्टार) शोध लावला आहे. आपल्या ‘मिल्की वे’ नावाच्या आकाशगंगेच्या केंद्राजवळच या तार्‍याचा शोध लावण्यात आला. ब्रिटनमधील हार्टफोर्डशायर युनिव्हर्सिटीच्या नेतृत्वाखाली ‘मिल्की वे’ मधील सुमारे एक अब्ज तार्‍यांच्या अभ्यासासाठी दहा वर्षे मोहीम राबवण्यात आली होती. त्यामध्येच या तार्‍याला शोधण्यात आले.

हा एक ‘बुजुर्ग’ तारा असून त्याचा समावेश आतापर्यंत लपून राहिलेल्या काही तार्‍यांमध्ये होतो. हा तारा अनेक वर्षे कमी प्रकाशवान दिसत होता. अंतराळात धुरासारख्या महाकाय ढगांच्या पलीकडे पाहिल्यावर हा तारा तसेच अन्य काही लपलेले तारे दिसून आले. हार्टफोर्डशायर युनिव्हर्सिटीतील प्रा. फिलीप ल्युकास यांनी या मोहिमेचे नेतृत्व केले. त्यांनी सांगितले की या मोहिमेत संशोधकांचे एक आंतरराष्ट्रीय पथक होते. त्यांनी ‘प्रोटोस्टार’ या नावाने ओळखले जाणारे डझनभर नवजात तारेही शोधून काढले.

यापैकी बहुतांश तारे हे मिल्की वेमध्ये धूळ आणि वायूंच्या आवरणाखाली लपले होते. लपलेले तारे शोधण्यासाठी संशोधकांनी इन्फ्रारेड लाईटचा वापर केला. युरोपियन सदर्न ऑब्झर्व्हेटरीच्या व्हेरी लार्ज टेलिस्कोपचा यासाठी वापर करण्यात आला. ब्रिटन, चिली, दक्षिण कोरिया, जर्मनी आणि इटलीच्या संशोधकांनी या मोहिमेत सहभाग घेतला. या टीमने ब्रिटनमध्ये तयार केलेली इन्फ्रारेड दुर्बीण वापरली जी चिलीच्या अँडीज पर्वतावर आहे. या मोहिमेतच हा जुनाट, महाकाय लाल तारा आढळून आला. त्याचे स्वरूप नव्या प्रकारचे असल्याचेही दिसून आले.

Back to top button