Halim seeds Benefits : हळीव स्त्रियांसाठी फायदेशीर, जाणून घ्या अधिक | पुढारी

Halim seeds Benefits : हळीव स्त्रियांसाठी फायदेशीर, जाणून घ्या अधिक

मंजिरी फडके

प्राचीन काळामध्ये आयुर्वेदामध्ये अनेक आरोग्यवर्धक औषधे सांगितली आहेत. त्यामध्ये तेलबिया या महत्त्वाच्या ठरतात. तेलबियांमध्ये तीळ, हळीव यांचे महत्त्वाचे स्थान आहे. ( Halim seeds Benefits )

संबंधित बातम्या 

स्निग्ध पदार्थ, प्रथिने व क्षार यांचे भांडार म्हणजे तेलबिया. आकाराने लहान असलेल्या या बिया पौष्टिकेतच्या बाबतीत मात्र उच्च स्तरावर आहेत. आरोग्य व सौंदर्यवर्धन असा दुहेरी फायदा तेलबियांमध्ये आढळून येतो. त्यामुळे विशेष करून स्त्रियांसाठी या फायदेशीर आहेत.

तरुणींनी व वयात येणार्‍या मुलींनी तेलबिया चटणी स्वरूपात किंवा नुसत्या खाण्याची सवय लावून घ्यावी. तेलबियांमध्ये हळीव हा एक महत्त्वाचा प्रकार आहे. हळीव म्हटले की, बाळंतिणीचे लाडू किंवा मग दिवाळीच्या किल्ल्यावर लवकर उगवणारे धान्य, एवढेच उपयोग आपल्या डोळ्यासमोर येतात. खरे तर हळीव हे अत्यंत पौष्टिक असे तेल बी आहे. 100 ग्रॅम हळिवात तब्बल 100 मि. ग्रॅम आयर्न आहे.

लोह, कॅल्शियम, फॉलेट, बेटाकेरोटीन, क जीवनसत्त्व व टेकोफेरॉक हे पोषक घटक हळिवात आहेत. हळीव हे रज:स्राव नियमित करण्यास मदत करते. तसेच त्यातील अँटिऑक्सिडंट्स व रक्तशुद्धी करणार्‍या घटकांमुळे हळीव हे तरुणींसाठी उपयुक्त ठरते. बाळंतिणीचे दूध वाढवण्यासाठी हळिवाचे लाडू किंवा खीर देण्याची प्राचीन पद्धत आपल्याकडे आहे. हळिवाचे लडू व दूध असा नाश्ता कृश तरुणींनी हिवाळ्यात घ्यावा. अंगकाठी भरण्यास मदत होते.

अंकुरलेले हळीव सलाडमध्ये घालून घेतल्यास ते डोळ्यांसाठी हितकर आहेत. हळिवांतील चिकट गुणधर्मामध्ये मलावरोधाची तक्रार कमी करण्यासाठी याचा वापर करता येतो. हळिवाच्या गॉयट्रोजेनिक गुणधर्मामुळे हायपोथायरॉईडचा त्रास असणार्‍यांनी या बियांचे पदार्थ खाऊ नयेत.

Back to top button