कसोटी मालिकेपूर्वी इंग्‍लंडला धक्‍का, ‘या’ खेळाडूला मिळाला नाही व्‍हिसा, बेन स्टोक्स व्‍यक्‍त केली नाराजी | पुढारी

कसोटी मालिकेपूर्वी इंग्‍लंडला धक्‍का, 'या' खेळाडूला मिळाला नाही व्‍हिसा, बेन स्टोक्स व्‍यक्‍त केली नाराजी

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेला गुरुवारपासून (२५ जानेवारी) प्रारंभ होत आहे. या मालिकेतील पहिला सामना हैदराबादच्या राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर होईल. आता या सामन्‍यापूर्वी इंग्लंड संघाला मोठा धक्‍का बसला आहे. कारण युवा फिरकीपटू शोएब बशीर याला भारताचा व्हिसा मिळू शकलेला नाही. ( व्हिसा हे एखाद्या देशाने व्यक्तीस दिलेले सशर्त परवानगी पत्र आहे. याद्वारे ही व्यक्ती त्या देशात अधिकृतपणे प्रवेश करू शकते. ). शोएब बशीर पहिल्‍या कसोटीला मुकल्‍याने इंग्‍लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली आहे. ( IND vs ENG Hyderabad Test )

 IND vs ENG Hyderabad Test :  दुर्दैवी निर्णय: बेन स्टोक्स

२० वर्षीय शोएब बशीर हा हैदराबाद कसोटीतून इंग्‍लंडच्‍या संघासाठी पदार्पण करणार होता. मात्र भारतीय उच्चायुक्तालयाने योग्य कागदपत्रे नसल्‍याने त्‍याचा व्‍हिसा नाकारण्‍यात आला. या प्रकरणी इंग्‍लंडचा कर्णधार बेन स्टोक्स याने तीव्र नाराजी व्‍यक्‍त केली आहे, तो म्‍हणाला की, आम्ही डिसेंबरच्या मध्यात संघाची घोषणा केली होती आणि आता बशीरला येथे येण्यासाठी व्हिसा मिळत नाही. हे दुर्दैवी आहे. या प्रकारामुळे मी खूप निराश आहे. इंग्लंडचे मुख्य प्रशिक्षक ब्रेंडन मॅक्युलम यांनी या आठवड्याच्या सुरुवातीला सांगितले होते की, पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यासाठी बशीर वेळेत पोहोचेल अशी मला आशा आहे. दरम्‍यान, या प्रकरणी ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे प्रवक्ते म्हणाले की, ” भारताने आपल्या व्हिसा प्रक्रियेत ब्रिटीश नागरिकांशी नेहमी न्याय्य वागणूक दिली पाहिजे.

बशीरच्या अनुपस्थितीत,इंग्लंड हैदराबादमध्ये अपेक्षित कोरड्या खेळपट्‍टीवर उपलब्ध असलेल्या तीनही आघाडीच्या फिरकीपटूंना मैदानात उतरवण्याचा विचार करत आहे. जॅक लीचसह लेगस्पिनर अहमद आणि अनकॅप्ड लँकेशायरचा डावखुरा फिरकी गोलंदाज टॉम हार्टली यांचा संघात समावेश होण्‍याची शक्‍यता आहे.


हेही वाचा : 

 

 

Back to top button