Asian Games Cricket : ‘धो डाला’…अवघ्‍या ९ चेंडूत अर्धशतक! नेपाळच्‍या फलंदाजांनी टी-20तील अनेक विश्‍वविक्रम माेडले…

नेपाळचा अष्टपैलू खेळाडू दीपेंद्र सिंग आयरी याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.
नेपाळचा अष्टपैलू खेळाडू दीपेंद्र सिंग आयरी याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले.

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : चीनमधील हांगझोऊ येथे सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्‍पर्धेत नेपाळच्‍या पुरुष क्रिकेट संघातील दीपेंद्र सिंग आयरी याने आज इतिहास रचला. त्‍याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. या कामगिरीमुळे त्‍याने भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंग याचा विक्रम मोडला आहे. युवराज सिंग याने T20 विश्वचषक २००७ स्‍पर्धेत इंग्लंडविरुद्ध 12 चेंडूत अर्धशतक झळकावण्याचा विक्रम केला होता. ( Asian Games Cricket )

दीपेंद्रसिंगची स्‍फाेटक खेळी, ८ षटकारांसह ९ चेंडूत अर्धशतक

नेपाळचा अष्टपैलू खेळाडू दीपेंद्र सिंग आयरी याने अवघ्या नऊ चेंडूंमध्ये अर्धशतक पूर्ण केले. आयरीने केवळ 10 चेंडूत 52 धावा केल्या, यामध्‍ये आठ षटकारांचा समावेश आहे. ताे नाबाद राहला त्याचा 520 चा स्ट्राईक रेट देखील T20I डावातील सर्वोत्तम ठरला आहे.
(Asian Games Cricket )

कुशलने टी-२०मध्‍ये झळकावले सर्वात वेगवान शतक, दिग्‍गजांचा विक्रम मोडीत

या सामन्‍यात नेपाळच्‍या कुशल मल्‍लाने केवळ ३४ चेंडूत शतक झळकावले. टी-20 फार्मेटमध्‍ये हे सर्वात वेगवान शतक ठरले आहे. त्‍याने भारताच्‍या भारताचा रोहित शर्मा आणि दक्षिण आफ्रिकेच्या डेव्हिड मिलर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. कुशलने ५० चेंडूंत ८ चौकार आणि १२ षटकारांसह १३७ धावा केल्या. रोहित शर्मा आणि मिलर यांच्या नावावर ३५ चेंडूंमध्ये शतक झळकावण्‍याचा विक्रम आहे.

२० षटकांत नेपाळच्‍या तब्‍बल ३१४ धावा , सर्वोच्‍च धावसंख्‍येचा विक्रम

नेपाळच्या पुरुष क्रिकेट संघाचा सामना आज मंगोलियाविरुद्ध होता. या आशियाई क्रीडा स्‍पर्धेतील पुरुष क्रिकेट स्‍पर्धेतील पहिलाच सामना होता. या सामन्यात नेपाळने २० षटकात ३ बाद ३१४ धावा केल्या. हाही सर्वोच्‍च धावांचा विश्‍वविक्रम ठरला आहे. २०१९ मध्ये आयर्लंडविरुद्ध अफगाणिस्तानच्या ३ बाद २७८ धावांचा विक्रमही नेपाळ संघाने टी-20 मधील सर्वोच्च धावसंख्‍येचा विक्रम आपल्‍या नावावर केला आहे. ( Asian Games Cricket )

Asian Games Cricket : एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रम

नेपाळच्‍या संघाने आपल्‍या डावात एकूण २६ षटकार ठोकले. टी-२० सामन्‍यातील एका डावात सर्वाधिक षटकारांचा विक्रमही आपल्‍या नावावर नाेंदवला. यापूर्वी अफगाणिस्‍तान संघाने २०१९ मध्‍ये आयर्लंडविरुद्ध एका डावात २२ षटकार ठोकले होते. आता एका डावात तब्‍बल २६ षटकार लगावत हाही विक्रम नेपाळने आपल्‍या नावावर केला आहे.

हेही वाचा : 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news