रशियातील अनोखे थीम पार्क | पुढारी

रशियातील अनोखे थीम पार्क

मॉस्को : रशिया हा अमेरिकेनंतर शस्त्रास्त्रांचा सर्वाधिक साठा असणारा देश म्हणून ओळखला जातो. रशियात तयार केले गेलेले टँक, ग्रेनेड लाँचर, लढाऊ विमाने भारतासह जगभरातील अनेक देश वापरतात. सतत युद्धासाठी तयार रहावे, ही शिकवणच जणू हा देश देत असतो. अगदी शालेय स्तरापासूनच तेथे स्वसंरक्षणाचे धडे दिले जातात. मात्र, याशिवायही रशियात असे एक अनोखे थीम पार्क आहे, जेथे छोटी मुले टँक, ग्रेनेड लाँचर व अन्य शस्त्रास्त्रांशी खेळताना दिसून येतात.

‘द सन’ने दिलेल्या वृत्तानुसार, या थीम पार्कला ‘पॅट्रिओट पार्क’ असे नाव देण्यात आले आहे. मात्र, येथे ज्या पद्धतीने मुले खेळताना दिसून येतात, त्यानुसार त्याला ‘मिलिटरी डिस्नेलँड’ या नावानेही ओळखले जाते. येथे येणारी छोटी मुले रोलर कोस्टरवर खेळण्याऐवजी लढाऊ विमाने व अन्य रणगाड्यांवर स्वार होताना सहजपणे दिसून येतात. हा पॅट्रिओट पार्क 4 हजार हेक्टर परिसरात विस्तारलेला असून अनेक ठिकाणी सैनिक वाहने, इंटर बॅलेस्टिक क्षेपणास्त्रे ठेवण्यात आली आहेत. येथे सोव्हिएत युगातील 268 विमाने, काही हेलिकॉप्टर्स व जवळपास 350 टँक व अन्य वाहनेदेखील ठेवली गेली आहेत.

हा थीम पार्क आठवड्यातून सहा दिवस सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत खुला असतो. 8 ते 13 वर्षे वयोगटातील मुलांना येथे काहीही शुल्क आकारले जात नाही. याशिवाय, येथे शूटिंग रेंज असून तेथे नेमबाजीवरही हात आजमावून पाहता येते. तसेच सैनिक प्रशिक्षणही इच्छेनुरूप दिले जाते.

Back to top button