रश्मिका मंदाना ‘डीपफेक’ प्रकरणातील सूत्रधाराची कबुली,”इन्स्टा पेजचे…” | पुढारी

रश्मिका मंदाना 'डीपफेक' प्रकरणातील सूत्रधाराची कबुली,"इन्स्टा पेजचे..."

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अभिनेत्री रश्मिका मंदाना डीपफेक व्हिडिओ प्रकरणातील मुख्‍य आरोपीला दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने अटक केली आहे. इमानी नवीन असे त्‍याचे नाव आहे. अभियंता असणारा नवीन हा सराईत सायबर गुन्हेगार आहे. त्‍याने रश्‍मिकाचा डीपफेक व्‍हिडिओ का केला, याची कबुलीही पोलिसांसमोर दिली आहे. ( Rashmika Mandanna deepfake video case)

पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी इमानी नवीन हा मूळचा गुंटूरमधील पेदानंदीपाडू गावचा रहिवासी आहे. सोशल मीडियावर रश्मिकाच्‍या नावाने इन्स्टा फॅन पेजचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्‍याने डीपफेक व्हिडिओ तयार केला होता. तो तीन प्रसिद्ध सेलिब्रिटींसाठी फॅन पेजेस चालवतो. रश्मिका मंदनाच्‍या फॅन पेजचे फॉलोअर्स वाढवण्यासाठी त्याने १३ ऑक्टोबर २०२३ रोजी डीपफेक व्हिडिओ तयार केला आणि पोस्ट केला होता. ( Rashmika Mandanna deepfake video case.)

इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट हटवल्या, पेजचे नावही बदलले

नवीन याने रश्‍मिकाचा डीपफेक व्‍हिडिओ पोस्‍ट केला आणि रश्मिकाच्‍या नावाने असणार्‍या पेजच्‍या फॉलोअर्सची संख्‍या दोन आठवड्यांत 90,000 वरून 1,08,000 पर्यंत वाढवली. दरम्‍यान, या प्रकरणी सर्वच स्‍तरातून टीका झाली. यानंतर नवीनने घाबरून इंस्टाग्राम पेजवरून पोस्ट हटवल्या. तसेच त्याने पेजचे नावही बदलले. तसेच सर्व डिजिटल डेटा डिलिट केला होता. ( Rashmika Mandanna deepfake video case.)

Rashmika Mandanna deepfake video case : कोण आहे आरोप इमानी नवीन?

रश्‍मिकाचा डीपफेक व्‍हिडिओ पोस्‍ट करणारा इमानी नवीन हा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बीटेक पदवीधर आहे. 2019 मध्ये त्‍याने ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्मवरून डिजिटल मार्केटिंगसह फोटोशॉप, व्हिडिओ एडिटिंग अभ्यासक्रम पूर्ण त्‍याने पूर्ण केला. मार्च 2023 मध्ये आपल्या गावी परतल्यानंतर त्‍याने फोटोशॉप, इंस्टाग्राम चॅनल प्रमोशन, यूट्यूब व्हिडिओ तयार/एडिटिंग आणि सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन यासारख्या सेवा घरबसल्या पुरवण्यास सुरुवात केली होती.

देशातील पहिल्‍या डिपफेक व्‍हिडिओची बळी ठरली हाेती रश्मिका मंदाना

६ नोव्‍हेंबर रोजी रश्मिका मंदानाचा सोशल मीडियावर एक एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यामध्‍ये ती एका लिफ्टमध्ये दिसत होती. डीपफेक व्‍हिडिओ व्‍हायरल झाल्‍यानंतर रश्‍मिकाने आपल्‍या पोस्‍टमध्‍ये लिहिले होते की, “माझा डीपफेक व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल होत आहे, ज्याबद्दल बोलताना मला खूप वाईट वाटते. AI केवळ माझ्यासाठीच नाही तर या तंत्रज्ञानाच्या गैरवापरामुळे धोक्यात असलेल्या आपल्यापैकी प्रत्येकासाठी खूप भीतीदायक आहेरश्मिका मंदानाच्‍या डीपफेक व्हिडिओ व्हिडिओमध्ये हुबेहुब रश्मिकासारखी दिसणारी मुलगी लिफ्टमध्ये चढताना दिसत आहे. ही मुलगी दुसरीच असली तरी. काही काळानंतर हे स्पष्ट झाले की हा व्‍हिडिओमधील तरुणी मंदाना नसून झारा पटेल आहे.

डीपफेक व्हिडिओ प्रकरणी सेलिब्रिटींसह अनेकांनी तंत्रज्ञानाच्या गैरवापराबाबत चिंता व्यक्त केली होती. डीपफेक व्हिडिओंच्या धोक्याला सर्वाप प्रथम रश्मिका मंदाना बळी पडली. यानंतर अभिनेत्री आलिया भट्ट, काजोल, माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर इत्यादी सेलिब्रिटींनाही याचा फटका बसला होता. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) मदतीने बनावट व्हिडिओ आणि ऑडिओने नवा धोका जाणवू लागला आहे.

माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा

डीपफेक व्हिडिओ तयार करण्यासाठी तंत्रज्ञानाच्या गैरवापराची केंद्र सरकारने गंभीर दखल घेतली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा घटनांबद्दल चिंता व्यक्त केली होती. केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर म्हणाले होते की, सरकार अशा प्रकरणांना सामोरे जाण्यासाठी माहिती तंत्रज्ञान कायद्यात सुधारणा करण्यावर विचार करत आहे.

हेही वाचा :

 

 

 

Back to top button