पुणे विभागात वर्षभर टँकरने पाणीपुरवठा | पुढारी

पुणे विभागात वर्षभर टँकरने पाणीपुरवठा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुणे विभागातील कोल्हापूर जिल्हा वगळता पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांत टँकरने पाणीपुरवठा करावा लागत आहे. तर, दुसरीकडे कृष्णा आणि भीमा खोर्‍यातील धरणांमधील पाणीसाठ्यात झपाट्याने घट होत असून, मार्च-एप्रिलमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रशासनाकडून तयारी केली जात आहे. गेल्या वर्षी पुणे विभागात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाला असून, धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा जमा झाला नाही, तर दुसरीकडे पाणीपातळीही खोल गेली आहे. विशेष म्हणजे, मार्च 2023 मध्ये सुरू झालेले टँकर पावसाळ्यानंतर हिवाळ्यातही सुरू आहेत.

पुणे विभागातील कोल्हापूर वगळता उर्वरित पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या चार जिल्ह्यांतील 132 गावे आणि 687 वाड्यांतील तब्बल दोन लाख 44 हजार 668 नागरिक, 85 हजार जनावरांना 130 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सातारा जिल्ह्यात पाणीटंचाई तीव्र असून, 75 गावे आणि 256 वाड्यांतील एक लाख 80 हजार नागरिक आणि 69 हजार जनावरांना 72 टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सांगली जिल्ह्यात 43 गावे आणि 335 वाड्यांतील एक लाख 4 हजार नागरिक आणि साडेपाच हजार जनावरांना 42 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. पुणे जिल्ह्यातील 10 गावे आणि 61 वाड्यांतील 22 हजार नागरिकांना 12 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील 4 गावे आणि 35 वाड्यांतील साडेदहा हजार नागरिक आणि दहा हजार 707 जनावरांना पाणी पुरविले जाते.

हेही वाचा

Back to top button