दशावतारी प्रभावळीतील रामलल्लाचे दूरदर्शन | पुढारी

दशावतारी प्रभावळीतील रामलल्लाचे दूरदर्शन

अयोध्या, वृत्तसंस्था : प्राणप्रतिष्ठेच्या तीन दिवस आधी श्री रामलल्लाच्या मूर्तीचे पहिले छायाचित्र शुक्रवारी समोर आले. सर्व विधी पार पडल्यानंतर दशावतारी प्रभावळ असलेली श्री रामलल्लाची 4.5 फुटांची (51 इंच) ही अत्यंत लोभस अशी बालस्वरूप मूर्ती आहे. प्रभावळीत विष्णूचे 10 अवतार कोरण्यात आले आहेत. मूर्तीच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे. प्राणप्रतिष्ठादिनी 22 जानेवारीला ती उघडण्यात येईल.

म्हैसूर येथील वाडियार राजघराण्याचे पारंपरिक शिल्पकार अरुण योगिराज यांनी ही मूर्ती साकारलेली आहे. गर्भगृहासाठी तीन शिल्पकारांना काम देण्यात आले होते; पैकी योगिराज यांनी घडविलेल्या मूर्तीची सर्वानुमते निवड झाली. उर्वरित दोन मूर्तीही मंदिर संकुलात प्रतिष्ठापित करण्यात येणार आहेत.

प्रभावळीत दशावतार

ॐ, स्वस्तिक, शंख-चक्र ही पवित्र चिन्हेही कमानीवर कोरलेली आहेत.
निळ्या आणि काळ्या पाषाणापासून ही मूर्ती बनविण्यात आलेली आहे.
श्री रामलल्लाच्या मस्तकावर सूर्याची प्रतिमा कोरलेली आहे.
श्री रामलल्ला उजव्या हाताने आशीर्वाद देत आहेत.
डाव्या हातात धनुष्यबाण आहे.
मुकुट सोन्याचा आहे.
मत्स्य, वराह, कूर्म, वामन, नरसिंह, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की हे अवतार उजवीकडून डावीकडे अशा क्रमाने आहेत.
मूर्तीचे वजन सुमारे 200 किलो आहे.

Back to top button