सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील | पुढारी

सरकारची कामे जनतेपर्यंत पोहोचवा : पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील

नगर : मोदींना तिसर्‍यांदा पंतप्रधान करण्यासाठी कार्यकर्ते सज्ज झालेले दिसत आहेत. असे असले तरी केंद्र आणि राज्याने राबविलेल्या योजनांची, विकासकामांची माहिती जास्तीत जास्त जनतेपर्यंत पोहोचवा, असे आवाहन करून महायुतीतील समन्वय कायम ठेवण्यासाठी तालुकानिहाय कमिट्या स्थापन करणार असल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नगरमध्ये महायुतीच्या जिल्हा कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.

व्यासपीठावर प्रदेश उपाध्यक्ष आमदार राम शिंदे, जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, आमदार बबनराव पाचपुते, खासदार सदाशिव लोखंडे, खासदार डॉ. सुजय विखे पाटील, आमदार संग्राम जगताप, आमदार मोनिका राजळे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील मंदिरांवर होणार लखलखाट!

जिल्ह्यात 22 ते 26 जानेवारी या कालावधीत प्रभू श्रीरामांचा उत्सव साजरा करणार आहोत. यात सर्व मंदिरांवर सुशोभीकरण केले जाणार आहे, मंदिरे साफसफाई करा, रांगोळ्या घाल्या, गुढ्या उभारा, दिवाळी साजरी करा, असे आवाहनी पालकमंत्री विखे पाटील यांनी केले.

वर्षभरात 10 हजार रोजगारनिर्मिती करणार!

जिल्ह्यात जागा नसल्याने उद्योगधंदे मागे जात होते. मात्र आता आपल्याकडे जागा उपलब्ध आहे. त्यामुळे वर्षभरात आयटी पार्कसह नवीन नवीन उद्योगधंदे आणून यातून 10 हजार रोजगारनिर्मिती केली जाईल, असा आशावाद पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तरुणांसाठी व्यक्त केला.

आठवलेंसाठी शिर्डी सोडा

रिपाइंचे जिल्हाध्यक्ष सुनील साळवे यांनी खासदार लोखंडेंसमोरच शिर्डी लोकसभेची जागा महायुतीने रामदास आठवले यांच्यासाठी सोडावी, अशी मागणी केली. मात्र तत्काळ पालकमंत्री विखे यांनी हा निर्णय आपल्या हातात नाही, असे सांगून फक्त शासनाच्या योजनांवर चर्चा करा, अशी सूचना केली. आमदार जगताप म्हणाले, अजित पवार हे युती सरकारमध्ये आल्यानंतर खर्‍याअर्थाने महायुतीचा उदय झाला. त्यामुळे आता 45 जागा जिंकणे अवघड नाही. लोकसभेच्या दोन्ही जागांवर महायुती जो उमेदवार देईल, त्याचे सर्वांनी काम करावे, असे कार्यकर्त्यांना आवाहन केले. खासदार लोखंडे, आमदार राजळे यांचीही भाषणे झाली. प्रा. भानुदास बेरड यांनी प्रास्ताविक, आभार आमदार बबनराव पाचपुते यांनी मानले. यावेळी अनिल शिंदे, दिलीप सातपुते, कपिल पवार, अक्षय कर्डिले आदी उपस्थित होते.

कर्डिलेंना हव्यात दोन्ही निवडणुका सोबत!

शिवाजी कर्डिले यांनी नेहमीच्या शैलीत भाषण करताना 15 दिवसांत खासदार झालेल्या सदाशिव लोखंडेंना कोपरखळ्या मारल्या. इकडे सुजय विखे दर्शनवारीसह डाळ, साखर वाटत असताना तुम्हाला तशी गरज वाटली नसावी. तुम्ही नशीबवान आहात, 15 दिवसांत खासदार होता, असा टोमणा मारला. लोकसभेनंतर पुढे काय होतंय सांगता येत नाही, त्यामुळे जर लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका घेतल्यास आम्ही सुखरूप राहू, त्यासाठी विखे पाटलांनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी करताच उपस्थितांमधून हास्याचे फवारे उडाले.

हेही वाचा

Back to top button