अतिक्रमणातून व्यापार्‍यांना त्रास नको; बैठकीत अनेकांनी मांडल्या व्यथा | पुढारी

अतिक्रमणातून व्यापार्‍यांना त्रास नको; बैठकीत अनेकांनी मांडल्या व्यथा

श्रीरामपूर : पुढारी वृत्तसेवा : अतिक्रमणाला कोणीशी पाठीशी घालत नाही, मात्र ते काढताना व्यापार्‍यांना त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी. त्यांच्या कागदपत्रांची पहाणी करावी. खात्री होत नाही, तोपर्यंत कारवाई स्थगित करून पुन्हा एकदा बैठक घेवून योग्य निर्णय घ्यावा, अशा सूचना महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पा. यांच्यावतीने भाजपचे तालुकाध्यक्ष दीपक पटारे व विधानसभा समन्वयक नितीन दिनकर यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

शहरातील मेनरोड, संगमनेर रोड, नेवासा रोड, बेलापूर रोड, छत्रपती शिवाजी महाराज रोडसह शहर हद्दीत प्रमुख रस्त्यांच्या दोन्ही बाजूंचे अतिक्रमण हटवण्यासंदर्भात पालिकेने नोटीसा दिल्या. याप्रश्नी व्यापारी संघटनेने महसूलमंत्री विखे यांना निवेदन दिले होते. भाजपचे नितीन दिनकर, दीपक पटारे, केतन खोरे यांना व्यापारी व पालिकेच्या अधिकार्‍यांची बैठक घेण्याच्या सूचना केल्या होत्या. यानुसार पालिका सभागृहात बैठक झाली.

यावेळी व्यापारी संघटनेचे पुरूषोत्तम झंवर, संजय छल्लारे, गौतम उपाध्ये, प्रविण गुलाटी, दत्ता धालपे, तिलक डुंगरवाल, संजय गांगड, कामगार नेते नागेश सावंत आदींसह व्यावसायिक उपस्थित होते. रस्त्यांची जागा वाहनांनी व्यापल्यामुळे व्यवसायिकांना त्रास होत आहे. शहरांमध्ये पार्किंगची व्यवस्था नसल्याने हे प्रश्न निर्माण झाले. व्यापार्‍यांना सहकार्य करावे, अशी मते केतन खोरे, तिलक डुंगरवाल, संजय गांगड, नागेश सावंत, पुरूषोत्तम झंवर, शिवसेनेचे श्रीरामपूर विधानसभा संघटक संजय छल्लारे यांनी मांडली.

दरम्यान, शासकीय जागेवरील अतिक्रमण होऊ नये, त्यामुळे वेळोवेळी ही अतिक्रमणे काढावी, या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार शासनाने सूचना केलेल्या असतात. काही लोकांच्या घरासमोर, मोकळ्या जागेत अतिक्रमण झाले. हे नागरिक न्यायालयात गेली. काहींनी जिल्हाधिकारी, मंत्रालय व मुख्यमंर्त्र्याकडे तक्रारी केल्या. यामुळे वरिष्ठ कार्यालयाकडून अतिक्रमणासंदर्भात निर्देश आले. न्यायालयाचे आदेश आहेत. यामुळे अशा अतिक्रमणास कुठलीही सवलत मिळणार नाही. इतर ठिकाणी पालिकेच्या जागेत अतिक्रमणासंदर्भात कागदपत्रे तपासून मदत केली जाईल, असे आश्वासन मुख्याधिकारी गणेश शिंदे यांनी दिले.

हेही वाचा

Back to top button