माझ्या खात्यामुळे देशातील 40 टक्के प्रदूषण : नितीन गडकरी | पुढारी

माझ्या खात्यामुळे देशातील 40 टक्के प्रदूषण : नितीन गडकरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : देशात प्रदूषणाची समस्या वाढत असून आजही आपल्याला 85 टक्के इंधन आयात करावे लागते. मी रस्ते वाहतूकमंत्री असून देशातील 40 टक्के प्रदूषणाला माझे खाते जबाबदार असल्याचे दु:ख मला होत असल्याची भावना केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी शुक्रवारी येथे व्यक्त केली. त्यामुळे ग्रीन हायड्रोजन हेच भविष्यातील स्वच्छ व प्रदूषणमुक्त जैविक इंधन असल्याचेही त्यांनी नमूद केले.

मांजरी येथील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट येथे आयोजित तिसर्‍या आंतरराष्ट्रीय साखर परिषदेत ते शुक्रवारी (दि.12) दुपारी बोलत होते. या वेळी व्हीएसआयचे अध्यक्ष शरद पवार व अन्य मान्यवर उपस्थित होते. उसाची उत्पादकता वाढल्याने उत्पादन खर्च कमी होतो. त्यामुळे विदर्भात ड्रोनद्वारे आम्ही नॅनो युरियाचा वापर वाढविला आहे. मी विदर्भातील शेतकरी आहे. त्याठिकाणी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची शाखा सुरू झाल्याने विदर्भातील ऊस शेती वाढण्यास फायदाच होईल, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त करून ते म्हणाले, ब्राझिल, चीन, भारत हे साखरेचे मोठे उत्पादक देश असून जगाच्या 20 टक्के साखर उत्पादन हे भारतात होते. साखर उत्पादन वाढविणे हे उद्योगासाठी अडचणीचे आहे. साखर उद्योगाने आता आर्थिक बाबींचा विचार करून साखरेऐवजी इथेनॉल आणि तत्सम जैविक इंधनासारख्या उत्पादनावर भर द्यायला हवा.

इथेनॉलवरील 300 पंप होणार

पेट्रोलियम मंत्रालयाने इथेनॉल पंप सुरू करण्याबाबतची माझी विनंती मान्य केल्याबद्दल मी आनंदी आहे. इंडियन ऑइलने देशात इथेनॉलवरील 300 पंप सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. आपल्या साखर कारखान्यांकडे बहुतांशी डिझेलचे पंप आहेत. त्यामुळे प्राधान्यक्रम देऊन आपल्या साखर कारखान्यांनी इथेनॉलचे पंप सुरू करावेत. त्यातून त्यांनी मोटारसायकल्स, स्कूटर व अन्य वाहनांना शंभर टक्के इथेनॉलचा पुरवठा करावा, अशीही सूचना या वेळी गडकरी यांनी केली.

हेही वाचा

Back to top button