वॉशिंग्टन : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था 'नासा'ने आपली आर्टेमिस मोहीम पुढे ढकलली आहे. या मोहिमेचा उद्देश अंतराळवीरांना चंद्रावर घेऊन जाणे हा होता. पन्नास वर्षांपूर्वी 'नासा'च्याच अपोलो मोहिमांमधून अनेक अंतराळवीर चांद्रभूमीवर जाऊन आल्यानंतर या मोहिमेतच आता मानवाचे पाऊल चंद्रावर पडणार आहे. मात्र, आता ही मोहीम 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. यापूर्वी ही मोहीम 2025 पर्यंत राबवण्याची योजना होती.
आर्टेमिस यानातून अंतराळवीरांना घेऊन जाण्यापूर्वी काही चाचण्या घेतल्या जात आहेत. त्यापैकी 'आर्टेमिस-2' मोहीम यावर्षीच लाँच केली जाणार होती. आता तांत्रिक कारणांमुळे या दोन्ही मोहिमा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. 'नासा'च्या अधिकार्यांनी सांगितले की या मोहिमेबाबत आम्ही अतिशय उत्साहित आहे. अर्धशतकानंतर आता आम्ही या मोहिमेतून मानवाला चंद्रावर पाठवण्याची तयारी करीत आहे.
मात्र, आता असे वाटत आहे की यासाठी थोडी वाट पाहावी लागेल. ही मोहीम सुरक्षित बनवण्यासाठी आर्टेमिस-2 आणि आर्टेमिस-3 च्या वेळापत्रकाचे नियोजन होत आहे. त्यामधून यानाचा विकास, संचालन आणि अन्य बाबी स्पष्ट होतील. शिवाय चांद्रभूमीवर उतरत असताना अंतराळवीरांनी जे स्पेससूट वापरायचे आहेत त्यांची व अन्य सामग्रीची तयारी करण्यातही विलंब होत आहे. या मोहिमेतून चार अंतराळवीरांना चंद्रावर पाठवले जाईल.