Crime News : व्यापार्‍यांची रोकड लुटणारे जेरबंद; एलसीबीची कारवाई | पुढारी

Crime News : व्यापार्‍यांची रोकड लुटणारे जेरबंद; एलसीबीची कारवाई

नगर : पुढारी वृत्तसेवा : अहमदनगर शहरातील व्यापार्‍याचे गल्ल्यातील रोख रक्कम चोरी करणारे व घरफोडी करणारे दोन सराईत गुन्हेगार स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला असून, तीन गुन्ह्यांची उकल करण्यात आली. विठ्ठल संजय घोडके (वय 24), सचिन सुभाष घोडके (वय 33, दोघे रा. घोसपुरी, ता. नगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.

अधिक माहिती अशी, नालेगाव येथील तानवडे लॅबजवळील कॉन्ट्रॅक्टर गुलाब पांडुरंग कराळे यांच्या ऑफिसमधील ड्रॉव्हरमधून कोणीतरी तीन लाख रुपये चोरून नेले. तसेच, नोव्हेंबर 2023 मध्ये दिवाळी सणाच्या काळात व्यापारी दीपक टेकचंद आहुजा यांच्या दुकानातून दोन लाखांची रोकड अनोळखी व्यक्तीने चोरून नेली. याबाबतही गुन्हा दाखल झाला होता. विकी श्रीचंद हर्दवाणी यांच्या दुकानातील रोख रक्कम बॅगेत ठेवून घराचे गेटजवळ उभे असताना अनोळखी दोघांनी 50 हजारांची रोकड असलेली बॅग हिसकावून नेल्याचा गुन्हा दाखल झालेला आहे.

शहरातील चोरीच्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांना तपासाच्या सूचना दिल्या. पोलिस निरीक्षक आहेर यांनी सहायक पोलिस निरीक्षक हेमंत थोरात, पोलिस कर्मचारी सुनील चव्हाण, संदीप पवार, देवेंद्र शेलार, रविंद्र कर्डिले, भिमराज खर्से, अमृत आढाव, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व संभाजी कोतकर यांचे पथक नेमूण तपास सुरू केला.

पोलिस निरीक्षक आहेर यांना माहिती मिळाली वरील गुन्हा विठ्ठल घोडके व सचिन घोडके (रा. घोसपुरी, ता. नगर) यांनी केला असून ते चोरलेली रक्कम घेऊन बाहेरगावी जाणार आहेत. त्यानुसार पोलिस पथकाने नगर-दौंड रस्त्यावरील हॉटेल सोनाली येथे सापळा लावला.
त्यावेळी दोन संशयित दुचाकीवर येताना दिसले. पोलिसांना पाहताच पळू जाऊ लागले. पोलिसांनी पाठलाग करून त्यांना पकडले. त्यांनी वरीलप्रमाणे नावे सांगितली. त्यांची अंगझडती घेतली असता एक लाख 60 हजारांची रोकड मिळून आली. त्यांनी वरील तीनही गुन्ह्यांची कबुली दिली. आरोपी विठ्ठल घोडके याच्या घरातून 40 हजार व सचिन घोडके याच्या घरातून 10 हजारांची रोकड हस्तगत केली. आरोपींकडून एकूण दोन लाख 10 हजाराची रक्कम व दुचाकी असा दोन लाख 60 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. तपासाकामी तोफखाना पोलिस ठाण्यात हजर करण्यात आले आहे. यातील आरोपी विठ्ठल संजय घोडके सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुद्ध चोरीचे पाच गुन्हे दाखल आहेत.

हेही वाचा

Back to top button