खा. डॉ. सुजय विखे पाटील अन् आ. राम शिंदे अनेक दिवसांनी एका मंचावर! | पुढारी

खा. डॉ. सुजय विखे पाटील अन् आ. राम शिंदे अनेक दिवसांनी एका मंचावर!

गणेश जेवरे

कर्जत : आमदार राम शिंदे आणि खासदार डॉ. सुजय विखे पाटील अनेक दिवसांनंतर प्रथमच गुरुवारी (दि. 11) एका मंचावर आले. निमित्त होते आमदार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त कोंभळी (ता. कर्जत) येथे आयोजित कार्यक्रमाचे. डॉ. विखे यांनी आ. शिंदे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या खर्‍या; पण जिल्ह्यात त्यांच्या या ‘एकी’ची चांगलीच चर्चा सुरू झाली. त्यातच ‘हवा बदलत आहे,’ या शिंदे यांच्या सूचक वक्तव्याची भर पडली. लोकसभेच्या रिंगणात लंके किंवा पवार किंवा दोन्ही बाजूंनी होणार्‍या संभाव्य हल्ल्याला तोंड देण्यासाठी तर ही हवा बदलली नसेल ना, अशी खमंग चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

आ. राम शिंदे यांचा वाढदिवस कर्जत-जामखेड मतदारसंघात अनेक दिवसांपासून साजरा होत आहे. मात्र, यानिमित्ताने हे दोघे एकदाही कार्यक्रमासाठी एकत्र आले नव्हते. मात्र, कोंभळी येथील सरपंच राहुल गांगर्डे यांनी मात्र ही किमया करून दाखवली. एकाच मंचावर या दोघांचा वाढदिवस त्यांनी साजरा केला आणि या वेळी नृत्यांगना गौतमी पाटील यांच्या बहारदार गाण्यांचा कार्यक्रमदेखील झाला.

आ. शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त तालुक्यातील कोंभळी येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातच खा. विखे पाटील यांचाही वाढदिवस (नोव्हेंबरमध्ये झालेला) साजरा करण्याचे ‘औचित्य’ साधून या दोघांनाही निमंत्रित करण्यात आले होते. बसस्थानकाशेजारी झालेल्या मैदानात या कार्यक्रमासाठी मोठी गर्दी झाली होती. मोठा पोलिस बंदोबस्तही होता. राहुल गांगर्डे यांनी आमदार व खासदारांचा गांगर्डे कुटुंबीयांतर्फे सत्कार केला.

हवा का रुख बदला है…

आ. राम शिंदे या वेळी म्हणाले, की यंदा कधी नव्हे ते एवढ्या प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढदिवसानिमित्त कार्यक्रमांचे आयोजन होत आहे. जनतेचा एवढा प्रचंड प्रतिसाद कशामुळे मिळत आहे, हे आता मलाही समजत नाही. मात्र, हवा बदलली आहे हे आता निश्चित जाणवत आहे. राहुल गांगुर्डे माझ्यासारखे दिसतात असे खुद्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच मला सांगितले आहे, असे म्हणताच जोरदार टाळ्या पडल्या.

खा. विखे पाटील यांनीही आ. शिंदे यांना शुभेच्छा देताना खास राहुल गांगर्डे यांच्या निमंत्रणावरून आपण आलो आहोत आणि अतिशय चांगले आयोजन त्यांनी केले आहे, असे गौरवोद्गार काढले. गांगर्डे म्हणाले की, आ. शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना माझा लवकर नंबरदेखील येत नव्हता. यामुळे आ. शिंदे व खा. विखे पाटील यांनाच माझ्या गावात आणून सन्मान करण्याचे ठरवले आणि हा कार्यक्रम केला. आ. शिंदे यांचा डुप्लिकेट म्हणून मला सर्वजण ओळखतात, परंतु खर्‍या अर्थाने विकासाचा खरा चेहरा आ. शिंदे हेच आहेत.
दीपक गांगर्डे यांनी आभार मानले.

हेही वाचा

Back to top button