सातत्याने प्रयत्न, परिश्रम करा, रामराज्य दूर नाही : शिवराजसिंह चौहान | पुढारी

सातत्याने प्रयत्न, परिश्रम करा, रामराज्य दूर नाही : शिवराजसिंह चौहान

पुणे : पुढारी वृत्तसेवा : श्रीराममंदिर उभारले गेले आहे, मात्र रामराज्य अस्तित्वात येण्यासाठी आपल्या सर्वांच्या एकत्रित प्रयत्नांची आणि परिश्रमांची आवश्यकता आहे. आज मी माजी मुख्यमंत्री असलो, तरी नाकारला गेलेला नाही. आजही मध्य प्रदेशातील जनता प्रेमाने मला मामाच म्हणते. मी राजकारणातून बाहेर पडलेलो नाही. अजून बरीच कामे बाकी आहेत, असे सूचक विधान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी शुक्रवारी पुण्यात केले.

एमआयटी विश्वशांती विद्यापीठात आयोजित भारतीय छात्र संसद समारोप कार्यक्रमात चौहान बोलत होते. माजी सनदी अधिकारी आणि लोकसत्ता पक्षाचे अध्यक्ष जयप्रकाश नारायण, डॉ. स्वामी ज्ञानवत्सल, ज्येष्ठ संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. विश्वनाथ कराड, कार्याध्यक्ष प्रा. राहुल कराड या वेळी उपस्थित होते. चौहान यांनी तरुणांशी संवाद साधताना दहावीत असताना केलेल्या पहिल्या आंदोलनापासूनच्या आठवणी, मुख्यमंत्री काळात राबवलेल्या योजनांबाबत सांगितले. मध्य प्रदेशात मुलगी म्हणजे कुटुंबावरील भार असे मानले जायचे. हे चित्र बदलण्यासाठी आम्ही मुलींचे विवाह करायला सुरुवात केली. मुख्यमंत्री झाल्यावर लाडली लक्ष्मी योजना ही पहिली योजना सुरू केली. या योजनेमुळे मुलगी कुटुंबाला पैसे मिळवून देणारी ठरली.

Back to top button