IND vs AFG : मोहालीच्या थंडीची भारतीय खेळाडूंना हुडहूडी; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ | पुढारी

IND vs AFG : मोहालीच्या थंडीची भारतीय खेळाडूंना हुडहूडी; बीसीसीआयने शेयर केला व्हिडिओ

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन टी-20 सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना आज (दि.11) मोहाली येथे खेळवला जाणार आहे. मोहालीत थंडीचा कडाका पाहायला मिळत आहे. यातून भारतीय खेळाडूही सुटलेले नाहीत. त्यांना थंडीत सराव करणे कठीण होत आहे. सराव सत्रादरम्यान सर्व खेळाडूंना थंडीचा त्रास होत आहे. याचा व्हिडिओ बीसीसीआयने सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामध्ये सर्व खेळाडू आपले थंडीबाबतचे अनुभव सांगत आहेत. (IND vs AFG)

‘अफगाण चॅलेंज’ आजपासून

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील तीन सामन्यांच्या टी-20 आंतरराष्ट्रीय मालिकेतील पहिला सामना आज मोहालीच्या आय. एस. बिंद्रा स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली मजबूत संघ अफगाणिस्तानविरुद्ध तीन सामन्यांची टी-20 मालिका खेळणार आहे, पण पहिल्या सामन्यातून विराट कोहलीने वैयक्तिक कारणामुळे माघार घेतली आहे. विराटची कन्या वामिका हिचा दुसरा वाढदिवस 11 जानेवारीला आहे आणि कदाचित त्यामुळेच त्याने पहिल्या सामन्यात न खेळण्याचा निर्णय घेतला असावा. पण, तो दुसर्‍या व तिसर्‍या सामन्यात खेळणार आहे.

हार्दिक पंड्या, सूर्यकुमार यादव, ऋतुराज गायकवाड हे जखमी असल्याने खेळणार नाहीत, तर जडेजा, बुमराह, सिराजला विश्रांती देण्यात आली आहे. त्यामुळे कर्णधाराला अंतिम 11 जणांचा संघ निवडताना फारशी डोकेदुखी होणार नाही. जून 2024 मध्ये होणार्‍या टी-20 वर्ल्डकपपूर्वी टीम इंडियाचे मोजकेच सामने होणार आहेत. त्यामुळे रोहित आपला पूर्ण क्षमतेचा संघ आजमावणार आहे. दुसरीकडे राशिद खान या मालिकेत खेळणार नसल्याने अफगाणिस्तान संघाला धक्का बसला आहे.

अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात डावखुरा फलंदाज यशस्वी जैस्वाल कर्णधार रोहित शर्मासह सलामीला येऊ शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल ही जोडी कशी कामगिरी करते, त्यावर विश्वचषकातील रणनीती ठरणार आहे. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल पॉवर प्लेमध्ये किती धावा करतात यावर सर्व काही अवलंबून आहे. विराटच्या अनुपस्थितीत शुभमन गिल तिसर्‍या क्रमांकावर येईल.

तिलक वर्माला चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून संधी मिळू शकते. यष्टिरक्षक फलंदाज संजू सॅमसन पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊ शकतो. फिनिशर रिंकू सिंग सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करेल हे निश्चित मानले जात आहे. अफगाणिस्तान विरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात अष्टपैलू अक्षर पटेलला 7 व्या क्रमांकावर फलंदाजीची संधी दिली जाईल. अक्षर पटेल टीम इंडियाला फिरकी गोलंदाजीबरोबर फलंदाजीही मजबूत करेल.

चायनामन फिरकी गोलंदाज कुलदीप यादवचा फिरकी गोलंदाजी विभागात समावेश करण्यात येणार आहे. पहिल्या टी-20 सामन्यात कुलदीप यादव अफगाणिस्तानसाठी सर्वात मोठा धोकादायक ठरू शकतो. अफगाणिस्तानविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात कर्णधार रोहित शर्मा वेगवान गोलंदाजांपैकी आवेश खान, मुकेश कुमार आणि अर्शदीप सिंगला संधी देऊ शकतात.

धुके, दव परिणाम करणार?

पहिल्यांदाच भारताविरुद्ध टी-20 मालिका खेळण्याच्या तयारीत असलेला अफगाणिस्तान संघ गेल्या काही दिवसांपासून मोहालीत सराव करत आहे. गुरुवारी मोहालीचे तापमान सायंकाळी किमान तापमान 5 ते 6 अंश राहण्याची शक्यता आहे आणि यावेळी दाट धुके आणि दव पडण्याची शक्यता देखील जास्त आहे. सामन्यादरम्यान दाट धुक्यामुळे द़ृश्यमानता कमी होईल आणि याचा परिणाम सामन्यावर होण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत, खेळाडू सामना थांबवू शकतात आणि नंतर सामना रद्ददेखील होऊ शकतो.

दवाचा प्रभाव कमी करणार

मोहालीच्या मैदानावर धुक्याऐवजी फक्त दव पडल्यास पंजाब क्रिकेट असोसिएशनने (पीसीए) त्याची तयारी केली आहे. येथील एका अधिकार्‍याने सांगितले की, गेल्या 2-3 दिवसांपासून येथे फारसे धुके नाही आणि दवबद्दल जर सांगायचे तर, आम्ही सामन्याच्या दोन दिवस आधी अस्सपा रसायनाचा वापर सुरू केला आहे, हे दवाचा प्रभाव कमी करेल. जमीन ओली होण्यापासून प्रतिबंध करेल. ही एक चांगली गोष्ट आहे, जी यापूर्वी देखील अनेक वेळा अनेक ठिकाणी वापरली गेली आहे.

खेळपट्टी

हिवाळ्यात मोहालीच्या मैदानावर वेगवान गोलंदाजांना मदत मिळते. ती वेगवान गोलंदाजांना स्विंग करण्यास मदत करते. मात्र, या मैदानावर हाय स्कोअरिंगचे सामनेही पाहायला मिळाले आहेत. खेळपट्टीवर चांगली उसळी असल्याने चेंडू बॅटवर सहज येतो. तसेच मैदानाचे आऊटफिल्डही वेगवान आहे.

हवामान अंदाज

भारत आणि अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या टी-20 च्या दिवशी सायंकाळी येथे खूप थंडी असेल. दिवसाचे कमाल तापमान 14 अंश सेल्सिअस राहील, तर किमान तापमान 9 अंश सेल्सिअस राहील. या सामन्यात पावसाची शक्यता नाही. पूर्ण 40 षटकांचा सामना अपेक्षित आहे.

हेही वाचा :

Back to top button