पिंपरी : पीएमआरडीएच्या जागेसाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांना साकडे | पुढारी

पिंपरी : पीएमआरडीएच्या जागेसाठी पुन्हा मुख्यमंत्र्यांना साकडे

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) पेठ क्रमांक 24 येथील भक्ती-शक्ती उद्यानाजवळील जागा शिवजयंती आणि अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव समितीसाठी द्यावी, अशी मागणी माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी शनिवारी (दि. 6) चिंचवड येथे केली. शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे चिंचवडला आले होते. त्या वेळी भापकर यांनी त्यांची भेट घेतली. पेठ क्रमांक 24 मधील संबंधित जागा शिवजयंती आणि अण्णा भाऊ साठे जयंती उत्सव तसेच अन्य उपक्रमांसाठी द्यावी, अशी मागणी त्यांनी या भेटीदरम्यान केली. यापूर्वीही मुख्यमंत्री एका कार्यक्रमानिमित्त पिंपरी-चिंचवडला आले होते. त्या वेळी त्यांनी ही मागणी केली.

मुख्यमंत्री शिंदे यांनी संबंधित जागा देण्याबाबत पीएमआरडीए आयुक्त राहुल महिवाल यांना तोंडी आदेश दिले होते. त्यानंतर यमुनानगर येथील माता अमृतानंदमयी मठाजवळील एक एकर जागा देण्याचा निर्णय पीएमआरडीएकडून घेण्यात आला. मात्र, ही जागा लोकवस्तीत असून त्या जागेचा शिवजयंती उत्सव किंवा अन्य सार्वजनिक प्रयोजनासाठी उपयोग होणार नसल्याचे शिवजयंती उत्सव समितीचे म्हणणे आहे. त्यानुसार ही जागा मिळावी म्हणून पुन्हा मारुती भापकर यांनी शनिवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांच्याकडे ही मागणी केली.

Back to top button