वृश्चिक : वार्षिक भविष्य २०२४ : प्रगती साधेल; मानसन्मान मिळेल | पुढारी

वृश्चिक : वार्षिक भविष्य २०२४ : प्रगती साधेल; मानसन्मान मिळेल

होराभूषण रघुवीर खटावकर

वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ व प्लुटो स्त्री रास, जलतत्त्व स्थिर स्वभाव, बौधचिन्ह – विंचू राशीत विशाखा (१ चरण) अनुराधा, ज्येष्ठा ही नक्षत्रे आहेत. या राशीसंबधी गैरसमजच जास्त आहेत. कारण या स्त्री राशीचा स्वामी मंगळ पुरुष आहे. तर रास जलतत्त्वाची असून राशीस्वामी अग्नितत्त्वाचा आहे. या विरोधाभासाचा शब्दश: अर्थ घेतला जातो. स्त्री पुरुषातील आकर्षक हे त्यांच्या लिंगभेदात आहे. तर शरीरातील रक्तातील जलत्व हे उष्णतेमुळे प्रवाही रहाते. यामुळे या राशीच्या व्यक्ती अत्यंत धाडसी, प्रशासकीय सेवेत, संरक्षण खात्यात पोलिस दलात उत्तम काम करताना आढळून येतात मात्र तुम्ही त्यांच्या वाटेला गेलात तर मात्र त्याचा बदला घेण्यासाठी ते शांतपणे अनेक वर्षेसुद्धा वाट पाहतात. स्त्री रास जलतत्त्वामुळे या राशीतील स्त्रिया शांत व एकमेकांशी चांगले संबंध ठेवून राहतात. मात्र अन्याय सहन करत नाहीत.

वर्षभर नेपच्यून व राहू तुमच्या राशीच्या पंचमस्थानी राहतील. गूढ शास्त्राची आवड राहील. हा एक शक्तीयोगच आहे. पण यावर्षी ज्यांची प्रसूती आहे अशा स्त्रियांना प्रसूतीसमयी त्रास संभवतो. शिक्षणापेक्षा विद्यार्थ्यांचे लक्ष कलादी क्षेत्राकडे जास्त राहील. गाफील राहिल्यामुळे शैक्षणिक नुकसान संभवते. तृतीय स्थानातील प्लुटोमुळे कल्पनाक्षेत्र विस्तारेल. भावडांना त्रास संभवतो. प्लुटो सर्व स्थानात चांगली व वाईट दोन्ही प्रकारची फले देतो. चतुर्थस्थानी तृतीयेश व चतुर्थेश मूलत्रिकोण राशीतील शनि शेती बागायती, प्रॉपर्टीमध्ये वाढ करण्यास मदत करेल. वडिलांचे कष्ट वाढतील आणि तुमची चिंता वाढेल. धंदा व्यवसायातून अपेक्षित लाभ होणार नाहीत एखादे धाडसी कृत्ये केल्यामुळे आपण बक्षिसास पात्र सुद्धा होऊ शकाल. नातेवाईकांच्या समस्या सोडविण्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल.

राशीस्वामी मंगळ पंचमेश (धनेश) तुम्हाला ऊर्जितावस्था आणणारा आहे. तो मकरेत तृतीयस्थानी (फेब्रु. – मार्च), मेषेत षष्ठस्थानी (जून जुलै) हर्ष योगात व कर्केत भाग्यात असताना धाडसाची भाग्यकारक कृत्ये होतील. आरोग्य चांगले राहील व सुवर्णालंकरांची प्राप्ती होईल. उर्वरित काळात भावनिक दडपण राहील. प्रॉपर्टीची कामे होतील.

गुरू मे पर्यंत षष्ठस्थानी आहे. शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळणार नाही. मे नंतर गुरू व जूननंतर हर्षल राशीच्या सप्तमस्थानी असतील. पुरस्कार मिळवाल. अचानक विवाह जुळून येईल, पण स्थळाची नीट चौकशी करा.

मंगळ मेषेत व बुध शुक्र मिथुनेत असताना अनेक विपरीत घटना घडल्या तरी तुमचा फायदाच होईल. मे जून जूलै या महिन्यात तुम्हाला फार मोठे आर्थिक लाभ होतील.

अमावास्येच्या जवळपास तुमच्या कर्माला नेहमीच भाग्याची जोड लाभत राहील. लाभातील केतुमुळे गुरू वृषभेत आल्यानंतर (मे नंतर) तुमच्या नावलौकिक खूप वाढेल. रवीचे मकरेतील (जानेवारी-फेब्रु.), मेषेतील (एप्रिल-मे) सिंह-कन्येतील (ऑगस्ट-सप्टें. ऑक्टो.) भ्रमण आपणास मोठे यश मिळवून देईल. नोकरीत बढती मिळेल. मंगल कार्य होतील. रविचे कुंभेतील (फेब्रु. – मार्च) मिथुनेतील (जून – जुलै) व तूळेतील (ऑक्टोबर नोव्हेंबरमधील) भ्रमणे चिंता वाढवणारी, धंद्यात मंदीचे वातावरण निर्माण करणारी व धंद्यात स्पर्धा वाढवणारी राहतील. या काळात खर्चाचे प्रमाण वाढेल व कष्टही वाढतील. तरीही हे वर्ष तुम्हाला प्रगतीच्या व कीर्तीच्या शिखराकडे वाटचाल करणारे ठरेल. सर्वसाधारण नियमाप्रमाणे कार्यसिद्धीस चंद्रबल आवश्यक असते.

चंद्रबल (तारखा)

जानेवारी : १२, १९, २०, २३, २८, २९, ३१
फेब्रुवारी : १५, १८, २१, २४, २६, २७, २८
मार्च : १४, १६, २२, २३, २६, ३०, ३१
एप्रिल : १३, १९, २०, २१, २२, २३, २६, २७
मे : १६, १८, १९, २०, २३, २४, २५, २८
जून : १२, १४, १६, १८, १९, २४, २५
जुलै : ११, १३, १४, १७, १८, २३, २४
ऑगस्ट : ९, १०, १३, १४, १८, १९, २४
सप्टेंबर : १०, ११, १४, १५, २०, २१, २२
ऑक्टोबर : ११, १२, १३, १८, १९, २०
नोव्हेंबर : ८, १४, १८, २०, २३, २५, २९
डिसेंबर : १२, १३, १४, १५, २०

Back to top button