Shambhuraj Desai : वरिष्ठांनी महायुतीत त्रास देणाऱ्याचे कान टोचावेत : शंभूराज देसाई | पुढारी

Shambhuraj Desai : वरिष्ठांनी महायुतीत त्रास देणाऱ्याचे कान टोचावेत : शंभूराज देसाई

विटा : पुढारी वृत्तसेवा : महायुतीत जर कोणी त्रास देत असेल, तर त्याचे कान टोचण्याची भूमिका त्यांच्या वरिष्ठांनी घ्यावी. अन्यथा अरे ला कारे करण्याची भूमिका शिवसैनिकांना जमते, असा सूचक इशारा उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांनी महायुतीतील सहकारी पक्ष भाजप आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या नेत्यांना दिला. Shambhuraj Desai

आमदार अनिल बाबर यांच्या वाढदिवसानिमित्त शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री शंभूराज देसाई, शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर, उद्योग मंत्री उदय सामंत, पालकमंत्री तथा कामगार मंत्री सुरेश खाडे, जिल्हा बँकेचे संचालक तानाजी पाटील, माजी नगरसेवक अमोल बाबर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर, महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील, योगेश जानकर आदी प्रमुख उपस्थित होते. Shambhuraj Desai

यावेळी आटपाडीचे तानाजी पाटील आणि सुहास बाबर यांनी आटपाडीतील भाजप नेते आमदार गोपीचंद पडळकर, ब्रम्हानंद पडळकर, आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांचे नाव न घेता तक्रारीचा पाढा वाचला.
मंत्री देसाई म्हणाले की, आमदार बाबर यांनी मला मंत्रीपद नाही दिले तरी चालेल, मात्र माझ्या भागासाठी महत्त्वाचा असणारा टेंभू योजनेच्या सहाव्या टप्प्याची मंजुरी आणि त्याला निधीची तरतूद झाली पाहिजे, असे अगदी उठावाच्यावेळी सांगितले होते. अत्यंत शिस्तप्रिय आणि विकासासाठी कटीबद्ध असे त्यांचे नेतृत्त्व आहे.

सत्तेमध्ये तिसरा पक्ष आल्याने मंत्रिमंडळाचा विस्तार वेगळ्या पद्धतीने झाला. अन्यथा आमदार बाबर कधीच मंत्री झाले असते. आता नव्याने आलेले काही लोक त्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहेत. आता असा एखादा चुटपूट नेता उलटे काही करण्याचा प्रयत्न करीत असेल, तर त्यांचा बंदोबस्त करण्यात येईल. हा विषय आम्ही महायुतीच्या आगामी समन्वय समितीच्या बैठकीत घेणार असल्याचे देसाई यांनी सांगितले.

मंत्री सामंत म्हणाले, आमदार बाबर यांनी एमआयडीसीची मागणी केली आहे, तुम्ही जागा सुचवाल तिथे एमआयडीसी करू, त्यासाठी आताच तांत्रिक मंजुरी दिली, असे जाहीर करतो. सध्या राज्यात सर्वत्रच व्हॉट्सअॅप, फेसबुक नेत्यांची संख्या वाढली आहे. त्यांचा त्रास सर्वांनाच होत आहे. तरी त्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी त्यांनी पालकमंत्री सुरेश खाडे यांच्याकडे केली.

मंत्री केसरकर म्हणाले की, आमदार बाबर यांनी मतदारसंघात टेंभू योजनेचे पाणी आणले आहे. आता प्रत्येकाच्या शिवारात पाणी पोहोचवण्यासाठी पुढचे आमदार तेच असले पाहिजेत, यासाठी तुमची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सुहास बाबर यांना मोठे पद देवू केले होते. मात्र, आपल्या मुलाला पद नको, भागाला पाणी द्या, असे म्हणणारे कदाचित ते एकमेव आमदार असतील, असे केसरकर यांनी सांगितले.

आमदार बाबर म्हणाले, मी राजकारणात आल्यापासून दुष्काळी भागातील लोकांचे कष्ट बघितले आहेत. त्यामुळे आजची गर्दी आणि शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मी भारावून गेलो आहे. देशाच्या कोणत्या ही भागात गेलात, तरी आमच्या मतदारसंघातील गलाई बांधव भेटतात. त्यांचा उद्योग अडचणीत आहे. त्यांना सुक्ष्मलघु उद्योग म्हणून मान्यता मिळावी. आमच्या भागातील भाजीपाला, निर्यातक्षम द्राक्षे आणि डाळिंब आदी पिकांवर प्रक्रिया केंद्रे आवश्यक आहेत. तसेच आटपाडी औद्योगिक वसाहतीचा प्रश्न मार्गी लागावा, अशी मागणी आमदार बाबर यांनी यावेळी केली.

सुहास बाबर म्हणाले की, आमचे राजकीय विरोधक काँग्रेस-राष्ट्रवादीत नाहीत. तर महायुतीच्या घटक पक्षातील लोकच आम्हाला विरोध करतात. महायुतीचा धर्म ते पाळत नाहीत. मात्र आमच्यावर टीका करणाऱ्यांनी भाजपला जेवढी मदत केली नाही, तेवढी मदत आम्ही केली आहे.

हेही वाचा 

Back to top button