सांगली : कुपवाड येथे दुचाकींच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू | पुढारी

सांगली : कुपवाड येथे दुचाकींच्या धडकेत दोन युवकांचा मृत्यू

कुपवाड; पुढारी वृत्तसेवा : माधवनगर – मिरज रस्त्यालगत असलेल्या चाणक्य चौकात एका शाळेसमोरील रस्त्यावर दोन दुचाकींची जोरदार धडक झाली. या भीषण अपघातामध्ये दोन्ही दुचाकीवरील दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला. पंकज सुभाष लोहार (वय 22, रा. सुतार गल्ली, शामनगर, कुपवाड) व किरण हणमंत कोळी (17, रा. मंगलमूर्ती कॉलनी, कुपवाड) अशी ठार झालेल्यांची नावे आहेत. गुरुवारी रात्री ही घटना घडली.

किरण हा दुचाकीवरून (एम. एच. 10, बी.डब्ल्यू. 4907) चाणक्य चौकातून मिरजेकडे जात होता, तर पंकज हा दुचाकीवरून (एम. एच. 10 डी. एस. 9766) मिरजेहून घरी जात होता. चाणक्य चौकाजवळ एका शाळेसमोरील रस्त्यावर या दोन्ही दुचाकींची समोरासमोर जोरदार धडक झाली. या धडकेत दोघेही रस्त्यावर आदळले. दोघेही गंभीर जखमी होऊन रक्ताच्या थारोळ्यात पडले. डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघेही जागीच ठार झाले. अपघाताची माहिती मिळताच आयुष हेल्पलाईन टीम तातडीने घटनास्थळी दाखल झाली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या दोघांनाही सांगलीतील शासकीय रुग्णालयात दाखल केले. पण डॉक्टरांनी दोघांचाही मृत्यू झाल्याचे सांगितले.

अपघाताची माहिती मिळताच कुपवाड व संजयनगर या दोन्ही पोलिस ठाण्यातील पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. कुपवाड पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून अपघातातील दोन्ही दुचाकी जप्त केल्या आहेत. दरम्यान, घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, मृत पंकज हा सुतारकाम करीत होता, तर किरण कोळी हा एका हॉटेलमध्ये काम करीत होता.

Back to top button