टेक इन्फो : उद्याचे स्मार्ट मोबाईल फोन | पुढारी

टेक इन्फो : उद्याचे स्मार्ट मोबाईल फोन

डॉ. दीपक शिकारपूर

गेल्या 52 वर्षांत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे सेलफोन होय. याबाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. उद्याचे मोबाईल फोन आपल्याला कार्यक्षमतेने काम करण्यास, चांगल्या प्रकारे संवाद साधण्यास आणि एकंदर स्मार्ट जगण्यास मदत करतील.

भारतात 31 जुलै 1995 रोजी पहिल्यांदा मोबाईल फोनमधून कॉल करण्यात आला होता. हा पहिला मोबाइल कॉल तत्कालीन केंद्रीय दूरसंचार मंत्री सुखराम आणि पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री ज्योती बसू यांच्या दरम्यान झाला होता. यासाठी नोकिया कंपनीचा हँडसेट वापरण्यात आला होता. सुरुवातीला फोन करण्यासाठी 16 रुपये 40 पैसे प्रतिमिनिट असे शुल्क आकारण्यात येत होते. इनकमिंग कॉलला शुल्क लागू होते. त्यासाठी 8 रुपये 40 पैसे असा दर होता. पूर्वी हँडसेटही कम्पास बॉक्सएवढे मोठे व अतिशय महाग असत. जगातला पहिला मोबाईल फोन हा तब्बल दोन किलो वजनाचा होता. हा फोन Motorola कंपनीने 1984 साली तयार केला होता. हा मोबाईल फोन चार्ज करण्यासाठी 10 तासांचा वेळ लागायचा. विशेष इतका वेळ चार्जिंग करूनही मोबाईलची बॅटरी अवघी 30 मिनिटे टिकायची. आताच्या पिढीला हे पटणार नाही. आता परिस्थिती क्रांतिकारीरीत्या बदलली आहे. इलेक्ट्रॉनिक युगाच्या सुरुवातीपासून (सुमारे 1970) गेल्या 52 वर्षांत सर्वाधिक वेगाने प्रसार झालेले उपकरण म्हणजे सेलफोन होय. याबाबतीत त्याने संगणकाला केव्हाच मागे टाकले आहे. किंबहुना हँडसेटमध्येच आता परिपूर्ण संगणक समाविष्ट झाला आहे.

मोबाईल उपकरणे सर्वव्यापी झाली आहेत. जगातील दोन तृतीयांश लोकसंख्या मोबाईल उपकरणाशी जोडली गेली आहे. याचा अर्थ असा, की कुठल्याही खरेदीपासून ते वाहनांची राईड मिळवणे, भेटींचे वेळापत्रक, डिझाईन, व्हिडीओ गेम खेळणे आणि बरेच काही-सर्व काही मोबाईलवर उपलब्ध झाले आहे. आगामी दोन-तीन वर्षांत मोबाईल फोनमध्ये अनेक नवीन वैशिष्ट्ये आणि क्षमता दिसून येतील. त्यापैकी काही गोष्टींचा आपण मागोवा घेऊ : शक्तिशाली प्रोसेसर आणि ग्राफिक्स चिप्समुळे फोन अधिक वेगाने कार्य करतील आणि अधिक जटिल ग्राफिक्स आणि व्हिडीओ (चलत्चित्रे) हाताळू शकतील.

स्मार्ट एआय आणि मशिन लर्निंगमुळे फोन अधिक स्वयंचलित आणि स्मार्ट होतील. उदाहरणार्थ, ते तुमच्या वापराची सवय शिकून तुम्हाला अधिक संबंधित सूचना आणि शिफारशी देऊ शकतील. नवीन प्रकारच्या डिस्प्लेमध्ये, रोल-आऊट डिस्प्ले, फोल्डेबल डिस्प्ले आणि 3 डी डिस्प्ले यांचा समावेश होतो. यामुळे फोन अधिक आकर्षक आणि वापरण्यास सोयीस्कर होतील. नवीन प्रकारचे कॅमेरे : यामध्ये, हाय-रिझोल्यूशन कॅमेरे, अल्ट्रा-वाईड-अँगल कॅमेरे आणि टेलिफोटो कॅमेरे यांचा समावेश होतो. यामुळे फोन अधिक चांगल्या प्रकारे फोटो आणि व्हिडीओ शूट करू शकतील.

नवीन प्रकारच्या सेन्सरमध्ये, हार्ट रेट सेन्सर, ब्लड ऑक्सिजन सेन्सर आणि बॉडी गती सेन्सर यांचा समावेश होतो. यामुळे फोन तुमच्या आरोग्याची निगराणी ठेवण्यास आणि तुमच्या जीवनशैलीचे अनुसरण करण्यात मदत करू शकतील. आपला फोन फॅमिली डॉक्टरचे काम करेल व आपल्या आरोग्याच्या चढउतारांचे पृथक्करण करेल.

अधिक शक्तिशाली इंटरनेट : यामध्ये, 5G, 6G, आणि Wi-Fi 7 यांचा समावेश होतो. यामुळे फोन अधिक वेगाने इंटरनेटशी जोडले जातील आणि अधिक शक्तिशाली डेटा कमी वेळात ट्रान्स्फर करू शकतील. या व्यतिरिक्त, मोबाईल फोन्समध्ये आणखी काही वैशिष्ट्ये दिसून येण्याची शक्यता आहे. उदाहरणार्थ, फोन्समध्ये अधिक सुरक्षितता वैशिष्ट्ये असू शकतात, जसे की चेहर्‍याचे ऍन्क्रिप्शन आणि बायोमेट्रिक ओळख. फोन्समध्ये अधिक पर्यावरणास अनुकूल वैशिष्ट्ये देखील असू शकतात, जसे की पुनर्वापर होणारे भाग आणि कमी ऊर्जा वापर. एकंदर उद्याचे मोबाईल फोन आपल्याला कार्यक्षमतेने काम करण्यास, चांगल्या प्रकारे संवाद साधण्यास आणि एकंदर स्मार्ट जगण्यास मदत करतील. यामुळे, आपण अधिक वेळ आपल्यासाठी महत्त्वाच्या गोष्टींवर घालवू शकू.

Back to top button