सांगली : शाळेतून परतताना दोन बहिणींना कारने उडविले; एकीचा मृत्यू | पुढारी

सांगली : शाळेतून परतताना दोन बहिणींना कारने उडविले; एकीचा मृत्यू

जत; पुढारी वृत्तसेवा : उटगी (ता. जत) येथील दोन सख्ख्या बहिणी शाळेतून परत येत असताना त्यांना एका भरधाव कारने उडविले. या धडकेत एकीचा मृत्यू झाला, तर दुसरी गंभीर जखमी झाली. श्रावणी उमेश लिगाडे (वय 10) असे उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या विद्यार्थिनीचे नाव आहे, तर तिची लहान बहीण श्रद्धा (वय 8) ही जखमी आहे. ही घटना शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास घडली. घटनेने उमदी, उटगी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

या दोन्ही बहिणी उमदी समतानगर येथील डेफोडीयल इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थिनी. श्रावणी इयत्ता चौथीत होती, तर श्रद्धा दुसरीत शिकते. या दोघीही उटगी येथील रहिवासी. त्या प्राथमिक शिक्षक उमेश लिगाडे यांच्या मुली. श्रावणी व श्रद्धा शाळा सुटल्यानंतर दुपारी तीनच्यादरम्यान उटगीपासून उमदीकडे काही अंतरावर असलेल्या लिगाडे यांच्या शेताजवळ स्कूलबसमधून उतरून शेतातील घराकडे जात होत्या. याचवेळी उटगीकडून उमदीकडे जात असलेल्या भरधाव कारने (एम. एच. 10. 2838) या दोघींना उडविले. त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांना जतकडे नेत असताना श्रावणीचा मृत्यू झाला, तर श्रद्धाला पुढील उपचारासाठी मिरज येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे.

घटनास्थळी शाळेतील, भागातील अनेक शिक्षक व गावकर्‍यांनी मोठी गर्दी केली होती. शवविच्छेदन जत ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. अपघातातील कारचालकाचे नाव मात्र उशिरापर्यंत समजू शकले नाही. तसेच रात्री उशिरापर्यंत उमदी पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती. श्रावणी आणि श्रद्धा रोज शाळा सुटल्यानंतर स्कूलबसमधून थेट गावातील घरी जातात. कालच त्या रोडवरच असणार्‍या त्यांच्या शेतात आजी-आजोबा काम करत असल्याने, तिथे उतरल्या.

Back to top button