Crime News : घरफोडी करणार्‍याच्या महाळुंगे पोलिसांनी मुसक्या आवळल्या | पुढारी

Crime News : घरफोडी करणार्‍याच्या महाळुंगे पोलिसांनी मुसक्या आवळल्या

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : घरफोड्या करणार्‍या अट्टल गुन्हेगाराच्या महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी मुसक्या आवळल्या. त्याच्याकडून 29 लाख तीन हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमीर शब्बीर शेख (25, रा. निगडी प्राधिकरण. मूळ रा. वडेश्वर काटे, वडगाव मावळ) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन शहाजी कर्पे यांच्या मोई येथील घरी 25 डिसेंबर रोजी सायंकाळी पाच ते रात्री पावणेदहा वाजताच्या कालावधीत घरफोडी झाली होती. याबाबत त्यांनी महाळुंगे एमआयडीसी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

चोरट्याने कर्पे यांच्या घराच्या पाठीमागील बाजूचे ग्रील कापून आत प्रवेश करत घरातून 47.8 तोळे सोने, पाच लाख 15 हजार रुपये रोख रक्कम असा एकूण 30 लाख 48 हजार 400 रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याबाबत माहिती मिळाल्यानंतर महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता पोलिसांना एक दुचाकी संशयितपणे जाताना दिसली. तसेच, दुचाकीचे चाक लाल रंगाचे असल्याचे निदर्शनास आले. दरम्यान, महाळुंगे पोलिस मोई, निघोजे, कुरुळी परिसरात गस्त घालत असताना त्यांना तीच दुचाकी दिसली.

पोलिसांनी दुचाकीस्वाराला थांबवण्याचा प्रयत्न केला असता तो दुचाकीसह पळून जाऊ लागला. संशय बळावल्याने पोलिसांनी शिताफीने पाठलाग करून दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले. त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्याने कर्पे यांच्या घरी चोरी केल्याचे कबूल केले.
पोलिसांनी अमीर शेख याच्याकडून 47.8 तोळे सोन्याचे दागिने, तीन लाख रुपये रोख रक्कम आणि दुचाकी असा एकूण 29 लाख तीन हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पोलिस सहआयुक्त संजय शिंदे, अपर पोलिस आयुक्त वसंत परदेशी, पोलिस उपायुक्त संदीप डोईफोडे, सहायक पोलिस आयुक्त राजेंद्रसिंग गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस निरीक्षक वसंतराव बाबर, पोलिस निरीक्षक (गुन्हे) संतोष कसबे, पोलिस उपनिरीक्षक विलास गोसावी, पोलिस अंमलदार राहू कोणकेरी, अमोल बोराटे, युवराज बिराजदार, संतोष होळकर, विठ्ठल वडेकर, संतोष काळे, किशोर सांगळे, शिवाजी लोखंडे, बाळकृष्ण पाटोळे, राजेंद्र खेडकर, संतोष वायकर, गणेश गायकवाड, राहुल मिसाळ, अमोल माटे यांनी केली.

हेही वाचा 

Back to top button