प्रांताधिकार्‍यांच्या कार्यालयात अजित पवार गटाचा राडा | पुढारी

प्रांताधिकार्‍यांच्या कार्यालयात अजित पवार गटाचा राडा

दौंड : पुढारी वृत्तसेवा :  दौंड येथे नव्याने सुरू झालेल्या प्रांताधिकारी कार्यालयाच्या कोनशिलेवर उपमुख्यमंत्री आणि पालकमंत्री अजित पवार यांचे नाव न लिहिल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने गुरुवारी (दि.4) या कार्यालयात प्रचंड राडा घातला. प्रांताधिकारी यांची खुर्ची उलटी करण्याचा प्रयत्न कार्यकर्त्यांनी केला, परंतु पोलिसांनी हस्तक्षेप केल्याने तो प्रकार टळला, कार्यालयामध्ये निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. 10 डिसेंबर रोजी या प्रांताधिकारी कार्यालयाचे उद्घाटन महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, दौंड तालुक्याचे आमदार राहुल कुल यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अजित पवार गट वैशाली नागवडे या वेळी म्हणाल्या की, याबाबत पंधरा दिवसांपूर्वी प्रांताधिकारी मीनाज मुल्ला यांना पत्र दिले होते; परंतु त्यांनी त्यावर वेळकाढूपणा केला.

आज मी कार्यालयात आले असता मला दोन तास बाहेर बसवण्यात आले व नंतर म्हणाले की, ’आम्ही याबाबत राजशिष्टाचार विभागाकडून मार्गदर्शन घेऊन ही कोनशिला त्यांनी जर बदलण्यास सांगितले, तर आम्ही ती बदलू. यामुळे कार्यकर्ते चिडले. त्यांनी कार्यालयातच मोठा गोंधळ घातला.’ चार तास चाललेल्या या आंदोलनामध्ये विभागीय जिल्हाध्यक्ष वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष उत्तम आटोळे, जीवराज पवार, वसीम शेख, सोनू धनवे, शहराध्यक्ष गुरमुख नारंग यांच्यासह अनेक कार्यकर्ते सायंकाळी आठ वाजले तरी उपविभागीय कार्यालयात ठाण मांडून बसले होते.

Back to top button