राजगडवरून दै. ’पुढारी’स शिवप्रेमींकडून शुभेच्छा | पुढारी

राजगडवरून दै. ’पुढारी’स शिवप्रेमींकडून शुभेच्छा

नानगाव : पुढारी वृत्तसेवा :  मागील 85 वर्षांपासून अविरतणे नि:पक्ष, निर्भीडपणे जनतेच्या प्रश्नांचा आवाज बनून वेगवेगळ्या विषयांवर परखड व सडेतोडपणे लिखाण करत जनतेच्या न्याय्य हक्कासाठी लढणार्‍या दै. ‘पुढारी’च्या 85 व्या वर्धापन दिनास दुर्गम राजगडची चढाई करत पारगाव सा.मा. (ता. दौंड) येथील शिवप्रेमींनी अनोख्या शुभेच्छा दिल्या. दौंड तालुक्यातील पारगाव सा.मा. येथील शिवस्वराज्य प्रतिष्ठानचे मावळे व शिवप्रेमी विकास ताकवले, अमोल जगदाळे, अतुल रणशिंग, पांडुरंग ताकवणे, सचिन बोत्रे व दै. ’पुढारी’चे पत्रकार राजेंद्र खोमणे यांनी बुधवारी (दि. 3) जिल्ह्यातील अतिदुर्गम व स्वराज्याची पहिली राजधानी किल्ले राजगडची चढाई करत पद्मावती माचीवर जाऊन येथील पद्मावती देवी व रामेश्वर मंदिरात दर्शन घेत दै. ’पुढारी’च्या वर्धापन दिनास व पुढील वाटचालीसाठी आगळ्यावेगळ्या शुभेच्छा दिल्या. या अनोख्या उपक्रमामुळे शिवप्रेमींचे सर्वस्तरावरून कौतुक होत आहे.

बुधवारी दुपारच्या सुमारास वरील शिवप्रेमींनी गुंजवणे मार्गाने गड चढाईस सुरुवात केली. चोरवाट (गुप्त दरवाजा) या खडतर, चढ-उतारांच्या तर अवघड वाटेने काही वेळातच गडात प्रवेश केला. थोड्या वेळात गडाची चढाई करत नि:पक्ष व निर्भीड वृत्तपत्राला अशा अनोख्या शुभेच्छा देण्याचा व पुढील काळातदेखील असाच बुलंद आवाज राहाण्यासाठी हा एक छान उपक्रम शिवस्वराज्य प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आला.

सर्वसामान्य जनतेचा आवाज असणार्‍या नि:पक्ष, निर्भीड आणि सडेतोडपणे लिखाण करणारे दै. ’पुढारी’ ग्रामीण व शहरी भागातील जनतेच्या प्रश्नांना खर्‍या अर्थाने वाचा फोडण्याचे काम करत आहे. त्यामुळे अशा वेगळ्याप्रकारे शुभेच्छा दिल्याने मनाला खूप आनंद होत आहे.
                                                        -सचिन बोत्रे, शिवप्रेमी, पारगाव सा.मा.

दै. ’पुढारी’ वृत्तपत्राप्रमाणेच थोड्या काळातच ’पुढारी न्युज’नेदेखील सर्वसामान्य जनतेच्या मनात आपला ठसा उमटवला आहे. बेधडक व निर्भीडपणे वेगवेगळ्या विषयांची मांडणी करत असल्याने खर्‍या अर्थाने ’पुढारी न्युज’ आता जनतेचा आवाज बनत आहे.
                                                 अमोल जगदाळे, शिवप्रेमी, पारगाव सा.मा.

Back to top button