Shoulder Pain | खांदेदुखीने त्रस्त आहात? ‘हे’ उपाय करा | पुढारी

Shoulder Pain | खांदेदुखीने त्रस्त आहात? 'हे' उपाय करा

डॉ. मनोज कुंभार

आपल्या खांद्याजवळच्या स्नायूंमध्ये, लिगामेंटस किंवा स्नायूबंधांमध्ये दुखले, तर त्याला खांदेदुखी किंवा खांद्याचा ऑर्थ्रायटिस म्हणतात. एकदा का खांदा दुखायला लागला, तर आपले कोणत्याच कामात लक्ष लागत नाही. ( Shoulder Pain )

अलीकडील काळात बहुतेक सर्व वयाच्या लोकांना केव्हा ना केव्हा तरी खांदेदुखीचा त्रास होतोच. याचे कारण बदललेली जीवनशैली. ज्या व्यक्ती दीर्घकाळ संगणक, लॅपटॉप, स्मार्टफोन, टॅब्लेट वापरतात, त्या व्यक्तींना खांदेदुखीचा त्रास प्रकर्षाने जाणवू शकतो. खांदेदुखीसाठी अनेक गोष्टी, सवयी आणि परिस्थिती कारणीभूत ठरू शकतात.

गरम आणि थंड गोष्टींचा वापर

खांदेदुखीची नुकतीच सुरुवात झाली असेल, तर थंड पदार्थांचा वापर करून दाह कमी करता येतो. जर खांद्यात खूप कळा येत असतील किंवा दुखत असेल आणि ऑर्थ्रायटिससारख्या वेदना होत असतील, तर काही गोष्टीचा वापर करा.

१) पंधरा किंवा वीस मिनिटांसाठी खांद्याला बर्फाने शेक द्या. त्यामुळे सूज आणि वेदना कमी होण्यास मदत मिळेल.
२) दाह न होता फक्त खांदा दुखत असेल तर गरम शेक घेतल्यास आराम मिळू शकतो.

फिजिकल थेरपी

ऑर्थ्रायटिसच्या सुरुवातीच्या काळात फिजिकल थेरपीचा नक्कीच फायदा होतो. खांद्याच्या स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी ही उपचार पद्धती उपयोगी ठरते. त्यामुळे स्नायूंची हालचाल कायम राहू शकते. स्ट्रेचिंगचे व्यायाम केल्याने खूप अधिक फरक पडू शकतो. स्नायूंना मजबुती तर मिळतेच, परंतु त्यांची तन्यता कायम राहण्यास मदत होते.

पोहणे आणि पाण्यातील व्यायाम खांदेदुखीमध्ये खूप जास्त फायदेशीर असतात. पाणी हे स्नायूंसाठी अवयवांसाठी मऊ गादीसारखे काम करते. त्यामुळे स्नायूंची ताकद वाढवण्यास त्याचा फायदा होतो. मात्र, सुरुवातीला खांद्यातील सांध्यांना फार ताण पडेल, अशा प्रकारे पोहू नका.

मसाज किंवा चोळणे

खांदेदुखी कमी करण्यासाठी मसाज किंवा चोळण्याने खूप फायदा होतो. हळूवार मसाज केल्याने खांद्याच्या स्नायूंना आराम मिळतो. स्नायूंवर आलेला ताण आणि त्यांना बसलेली ओढ कमी होते. त्याशिवाय तेथील रक्तप्रवाहात सुधारणा होते. सूज आणि त्यामुळे आलेला कडकपणा कमी होतो. मसाज करण्यासाठी ऑलिव्ह ऑईल, खोबरेल तेल, तीळ किंवा मोहरीचे तेलही वापरू शकता. तेल थोडेसे गरम करून मग खांद्याला चोळा.

हलक्या हाताने खांदा चोळा आणि दुखणे कमी करण्यासाठी आणि रक्तपुरवठा चांगला होण्यासाठी थोडासा दाब देऊन मसाज करा. मसाज दहा मिनिटांसाठी करा. त्यानंतर दुखर्‍या भागाला आराम मिळण्यासाठी त्यावर गरम टॉवेल ठेवा. त्यामुळे निश्चितच चांगले परिणाम पाहायला मिळतील. दुखणे कमी होईपर्यंत नियमितपणे मसाज थेरपीचा अवलंब करा. इलास्टिक बँडेजचा वापर दुखर्‍या जागेवर दाब देण्यासाठी करू शकता. ( Shoulder Pain )

Back to top button