थर्टी फस्ट : कायदा व सुव्यवस्थेसाठी चार हजार पोलिसांचा फौजफाटा | पुढारी

थर्टी फस्ट : कायदा व सुव्यवस्थेसाठी चार हजार पोलिसांचा फौजफाटा

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नववर्षाच्या स्वागतासाठी शहरात चार हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे. स्थानिक पोलिस ठाणे, गुन्हे शाखा, वाहतूक विभाग आणि विशेष शाखेचा हा बंदोबस्त तैनात असणार आहे. सरत्या वर्षाला निरोप देऊन नववर्षाचे स्वागत करण्यासाठी शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणात गर्दी होते. यासह काही संवेदनशील भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पुणे पोलिसांकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली आहे.

शहरातील कॅम्प व फर्ग्युसन रस्ता परिसर, विविध मॉल्स, हॉटेल्स, लॉज, ढाबे, बस, रेल्वेस्थानक, मंदिर, चर्च व धार्मिकस्थळांची तपासणी करण्यात येत आहे. यावेळी संशयित व्यक्ती आणि रेकॉर्डवरील गुन्हेगार तपासून योग्य ती खबरदारी पुणे पोलिसांकडून घेतली जात आहे. 31 डिसेंबर व नूतन वर्षाच्या स्वागत बंदोबस्तादरम्यान कुठेही घातपाताची घटना घडणार नाही, चेंगराचेंगरी होणार नाही, विशेषत: महिलांची सुरक्षितता, चेन स्नॅचिंग, पाकीटमारीसारख्या घटना घडणार नाहीत ही बंदोबस्ताची उद्दिष्टे निश्चित करण्यात आली आहेत.

यासह शहरातील विविध भागांमध्ये नाकाबंदीदेखील करण्यात येणार असून, वाहतूक शाखेकडून ट्रिपल सीट, ड्रंक अँड ड्राईव्ह, मॉडिफाय सायलेंसर व अन्य वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्‍यांवर कारवाई केली जाणार आहे. तसेच शहरातील महत्त्वाच्या आणि गर्दीच्या ठिकाणी बॉम्ब शोधक व नाशक पथकांकडून, तसेच श्वान पथकांकडून तपासणीदेखील केली जणार आहे. शहरातील या भागांमध्ये जलद प्रतिसाद पथक (क्यूआरटी) आणि दामिनी पथकदेखील तैनात असणार आहे. तसेच नागरिकांना कोणतीही आक्षेपार्ह माहिती मिळाल्यास त्यांनी तत्काळ 020-26126296 / 8975283100 / 8975953100 (व्हॉट्सअप) अथवा 112 या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन पुणे पोलिसांकडून करण्यात आले आहे.

दृष्टिक्षेपात पोलिस बंदोबस्त

  •  अपर पोलिस आयुक्त – 02
  •  पोलिस उपायुक्त – 05
  •  सहायक पोलिस आयुक्त – 10
  •  पोलिस निरीक्षक – 40
  •  सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक – 150
  •  पोलिस अंमलदार – 2700
  •  छेडछाडविरोधी पथक – 32
  •  दामिनी पथक – 16

वाहतूक शाखेचा बंदोबस्त

  •  पोलिस उपायुक्त – 1
  •  सहायक पोलिस आयुक्त – 3
  •  पोलिस निरीक्षक – 14
  • सहायक पोलिस निरीक्षक / उपनिरीक्षक – 33
  •  पोलिस अंमलदार – 570
  •  फिक्स पॉईंट – 33
  • डी डी पथक – 23
  •  पेट्रोलिंग मोबाइल – 27

हेही वाचा

Back to top button