न्यू इअर फिवर : पुण्यात अडीच हजार ठिकाणी रंगणार पार्टी | पुढारी

न्यू इअर फिवर : पुण्यात अडीच हजार ठिकाणी रंगणार पार्टी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : ‘हर्ष नवे, पर्व नवे, नव्या इच्छा-आकांक्षा… नवीन वर्ष घेऊनी आले नवी स्वप्नांची दुनिया…’ असे म्हणत पुणेकर नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी सज्ज आहेत. सरत्या वर्षाला निरोप देत नवीन वर्षाचे जंगी स्वागत होणार असून, रविवारी (दि. 31) रात्री न्यू इअर पार्टी रंगणार आहे. त्यासाठी हॉटेल्स, रेस्टॉरंट, रिसॉर्ट अन् विविध क्लबमध्ये हाऊसफुल्ल बुकिंग झाली आहे. सुमारे अडीच हजार हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि पब-क्लबमध्ये न्यू इअर पार्टीचे आयोजन केले असून, चिकन बिर्याणीपासून ते पिझ्झापर्यंत, अशा विविध लज्जतदार खाद्यपदार्थांची ऑर्डर देण्यात आली आहे. पुण्याजवळील पानशेत, भूगाव, मुळशी, लोणावळा आदी ठिकाणीही पार्ट्या होणार आहेत.

सरत्या वर्षाला निरोप देऊन 2024 या नवीन वर्षाचे स्वागत मोठ्या जल्लोषात होणार असून, विविध खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत अन् लाइव्ह म्युझिक बॅण्डच्या तालावर थिरकत न्यू इअर पार्टी रविवारी ठिकठिकाणी होणार आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठीचा फील सगळीकडे पाहायला मिळत आहे. पुण्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब आणि क्लब हाऊसमध्ये विशेष सजावट करण्यात आली असून, बॉलिवूड, डिस्को, डीजे… अशा थीमनुसार पाट्यार्र् रंगणार आहेत. तरुणाईने मित्र-मैत्रिणींबरोबर पबमध्ये जाऊन नववर्षाचे स्वागत करण्याचे ठरविले आहे. पुण्यातील मॉलमध्येही नवीन वर्षाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

या ठिकाणी रंगणार न्यू इअर पार्टी

डेक्कन परिसर, कोरेगाव पार्क, जंगली महाराज रस्ता, कॅम्प, विमाननगर, हिंजवडी, बाणेर, बावधन, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता, खराडी, विमानगर, कोथरूड, औंध आदी ठिकाणच्या हॉटेल्स, रेस्टॉरंट, पबमध्ये मोठ्या प्रमाणात बुकिंग झाली आहे. याशिवाय पुणे शहराजवळ असलेल्या रिसॉर्टमध्ये न्यू इअर पार्टीत डीजे सादरीकरण, बिर्याणीसह विविध खाद्यपदार्थांची मेजवानी अन् विविध गेम्स… अशी काहीशी तयारी करण्यात आली आहे.

हॉटेल्स-रेस्टॉरंटमध्ये खास सजावट

नवीन वर्षानिमित्त पुण्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्लब हाऊस अन् रिसॉर्टने विद्युतरोषणाईने उजळली आहेत. येथे खास सजावटही करण्यात आली आहे. तर रस्त्यांनाही वेगळे रूप प्राप्त झाले आहे. विविध रंगांची फुले, विद्युतरोषणाई अन् ‘हॅप्पी न्यू इअर’चे फलक लावलेले पाहायला मिळत आहेत. खासकरून कॅम्प, फर्ग्युसन महाविद्यालय रस्ता अन् डेक्कन परिसरात नवीन वर्षाचे जल्लोषी वातावरण पाहायला मिळत आहे.

 

यंदा हॉटेल्स, रेस्टॉरंट, पब, क्लब हाऊस अन् रिसॉर्टमध्ये चांगली बुकिंग झाली आहे. ते हाऊसफुल्ल आहेत. येथे विविध थीमनुसार न्यू इअर पार्टी आयोजित केली असून, सर्वच ठिकाणी लाइव्ह म्युझिक बँड, डीजे नाइट, सुफी-गझल नाइटसह विविध खाद्य पदार्थांसह विविध उपक्रमांचे आयोजन केले असून, रात्री बारा वाजता खास पद्धतीने नवीन वर्षाचे स्वागत होणार आहे. खाद्यपदार्थांच्या पार्सललाही मोठी मागणी आहे.

किशोर सरपोतदार, अध्यक्ष, पुणे रेस्टॅारंट्स असोसिएशन

हेही वाचा

Back to top button