मागोवा 2023 : राजकीय उलथापालथीचे पडसाद | पुढारी

मागोवा 2023 : राजकीय उलथापालथीचे पडसाद

ज्ञानेश्वर बिजले

पुण्याच्या राजकीय क्षेत्रात सरते वर्ष खळबळजनक घटनांनी गाजले. भाजपला कसबा पेठ हा बालेकिल्ला गमवावा लागला, तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याने विरोधी पक्षाची ताकद खच्ची झाली. वर्षभरातील घडामोडी आणि महापालिका निवडणुकीला विलंब यामुळे कार्यकर्त्यांत अस्वस्थता पसरली. सध्या पुणे शहरात नेतृत्वाची पोकळी निर्माण झाल्याचे जाणवते, या पार्श्वभूमीवर वर्षअखेरीला लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू झाली.

पुणे : महाविकास आघाडीने वर्षाच्या प्रारंभी पोटनिवडणुकीत विरोधकांना पराभूत करीत राजकीय आघाडी मिळविली, तर वर्षाच्या मध्याला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने महायुती बळकट झाली. भारतीय जनता पक्षाने विविध कार्यक्रमांचे आयोजन करीत सरत्या वर्षाच्या अखेरीला लोकसभा निवडणुकीच्या पूर्वतयारीमध्ये विरोधी पक्षांवर आघाडी मिळविल्याचे दिसून येते.
शिवसेनेने (उद्धव ठाकरे गट) जुने कार्यकर्ते सोबत ठेवण्यावर लक्ष केंद्रित केले. पक्षाची फेरमांडणी करताना महाविकास आघाडीतर्फे पुण्यातील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केली आहे. शिवसेना (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे) गटानेही पुण्यात विधानसभेबरोबरच महापालिका निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याच्या दृष्टीने हालचाली सुरू केल्या आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही पक्षाची बांधणी करताना लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येते. आम आदमी पक्षही 4 पान 4 वर

भाजपची पकड कायम

पुण्याच्या राजकीय क्षेत्रावर मजबूत पकड स्थापित केलेल्या भाजपला त्यांचा बालेकिल्ला मानल्या गेलेल्या कसबा पेठ मतदारसंघात पराभव पत्करावा लागल्याने मोठा धक्का बसला. आमदार मुक्ता टिळक यांचे निधन झाल्यानंतर कसबा पेठेत झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचे रवींद्र धंगेकर विजयी झाले. कसबा पेठ मतदारसंघाचे 25 वर्षे आमदार झाल्यानंतर पुण्याचे खासदार झालेले गिरीश बापट यांचे निधन झाले. दोन नेत्यांच्या निधनामुळे भाजपमध्ये एक प्रकारची पोकळी निर्माण झाली. कसबा पेठेतील पराभवानंतर या भागातील महापालिकेचे माजी सभागृह नेते धीरज घाटे यांच्यावर पक्षाने शहराध्यक्ष पदाची धुरा सोपविली. पुणे शहरातील पाच मतदारसंघात भाजपचे आमदार असून, पक्षाची आताही पुणे शहरातील राजकारणावर मजबूत पकड असल्याचे दिसून येते. भाजप आता लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागला असून, विरोधकांच्या तुलनेत ते आघाडीवर आहेत.

काँग्रेसपुढे गटबाजीचे आव्हान

राज्यातील सत्ता गेल्यानंतर, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्या महाविकास आघाडीने पुण्यातील पोटनिवडणूक एकत्रितपणे ताकदीने लढविली. धंगेकर विजयी झाल्याने, काँग्रेसला पुन्हा बळ मिळाले. पक्षाचे नेते राहुल गांधी यांनी काढलेल्या पदयात्रेला, तसेच नागपूर येथे नुकत्याच झालेल्या सभेला पुण्यातून शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. काँग्रेस कार्यकर्त्यातील मरगळ दूर झाली असली, तरी पक्षांतर्गत गटबाजी पुन्हा तोंड वर काढू लागल्याने स्थानिक नेत्यांपुढे ते एक आव्हान उभारण्याची शक्यता आहे. काँग्रेसमध्ये लोकसभा निवडणुकीच्या तयारीला वेग आला आहे.

राष्ट्रवादीवर फुटीचा परिणाम

विद्यमान उपमुख्यमंत्री अजित पवार पुण्यातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडून सत्तारूढ आघाडीत सहभागी झाले. त्यामुळे कार्यकर्त्यांचेही विभाजन झाले. पक्षाचे आत्तापर्यंत 78 नगरसेवक झाले. त्यापैकी 20 ते 25 जण अजित पवार यांचेसोबत आहेत, तर दहा-पंधरा जण शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील गटात आहेत. अन्य नगरसेवक दोन्ही गटाच्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्याने, त्या पक्षाची ताकद कमी झाली, तसेच त्याबरोबरच विरोधी पक्षाच्या आघाडीलाही मोठा धक्का बसला. जिल्ह्याचे पालकमंत्री पद अजित पवार यांच्याकडे आले. खासदार सुप्रिया सुळे याही त्यांच्या मतदारसंघातील खडकवासला भागासह पुणे शहरात सक्रिय झाल्याचे दिसून येते. पुणे जिल्ह्यातील राजकारणावर आगामी वर्षात राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीचे दूरगामी परिणाम होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

 

Back to top button