‘पुढारी’चा उद्या वर्धापन दिन | पुढारी

‘पुढारी’चा उद्या वर्धापन दिन

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : गेल्या 85 वर्षांपासून वाचकांच्या भावभावनांशी एकरूप होत कोल्हापूर म्हणजे दै. ‘पुढारी’ आणि ‘पुढारी’ म्हणजेच कोल्हापूर अशा अतूट नात्याची वीण दरवर्षी अधिकच घट्ट करणार्‍या दै. ‘पुढारी’चा सोमवारी (दि. 1) वर्धापन दिन साजरा होत आहे. वर्धापन दिनानिमित्त भाऊसिंगजी रोडवरील टाऊन हॉल गार्डनमध्ये स्नेहमेळाव्याचे आयोजन केले आहे.

निःपक्ष व निर्भीड पत्रकारितेचा मानदंड निर्माण केलेला दै. ‘पुढारी’ 85 वर्षांची वाटचाल पूर्ण करत 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्त ‘पुढारी’ भवनसमोरील ऐतिहासिक टाऊन हॉल गार्डनच्या हिरवळीवर सोमवारी (दि. 1) सायंकाळी 5 ते 8 या वेळेत स्नेहमेळावा होणार आहे. कोल्हापूरकरांसाठी नववर्षाच्या कौटुंबिक आणि जिव्हाळ्याच्या या सोहळ्याला जनतेने उपस्थित राहावे, असे आवाहन दै. ‘पुढारी’ व टोमॅटो एफ.एम.परिवाराने केले आहे.

जनमानसाच्या प्रश्नांवर सडेतोड भूमिका घेत, त्यांच्यामागे खंबीरपणे उभे राहत, त्यांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यात अग्रभागी असलेल्या
दै. ‘पुढारी’ने कोल्हापूरकरांच्या हृदयात अढळ स्थान निर्माण केले आहे. कोल्हापूरकरांनीही ‘पुढारी’ला आपल्याच दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनवला आहे. कोल्हापूरकरांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा दै. ‘पुढारी’ 1 जानेवारी 2024 रोजी 86 व्या वर्षात पदार्पण करत आहे. जगातील सर्वात उंच रणभूमीवरील सियाचीन येथे सैन्यातील जवानांसाठी रुग्णालय उभे करून सामाजिक दायित्वाची अखंड साक्ष देणार्‍या दै. ‘पुढारी’ने वाचकांशी असलेले आपुलकीचे नाते गेली 85 वर्षे अखंडपणे जपले आहे. जनमानसाशी असलेले ऋणानुबंध अधिक द़ृढ करत दै. ‘पुढारी’चा वर्धापन दिन सोहळा सोमवारी साजरा होत आहे.

Back to top button