जनतेचा आक्रोश भाजपला सत्तेवरून खाली खेचेल : खा. डॉ. अमोल कोल्हे | पुढारी

जनतेचा आक्रोश भाजपला सत्तेवरून खाली खेचेल : खा. डॉ. अमोल कोल्हे

तळेगाव ढमढेरे : पुढारी वृत्तसेवा : केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे शेतकर्‍यांसह सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले असून, त्याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठीच या आक्रोश मोर्चाचे आयोजन केले आहे. जनतेच्या मनातील हा आक्रोश येत्या लोकसभा निवडणुकीत भाजपला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी दिला.
शिक्रापूर (ता. शिरूर) येथे शेतकर्‍यांच्या प्रश्नावर आवाज उठविण्यासाठी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काढलेल्या आक्रोश मोर्चाचा गुरुवारी (दि. 28) दुसरा दिवस होता. शिरूर तालुक्यात या यात्रेचे आगमन होताना त्याची सुरुवात वढू येथे स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन करण्यात आली. पाबळ, धामारी, मुखई, जातेगाव बुद्रुक या ठिकाणी शेतकर्‍यांशी संवाद साधत शिक्रापूर येथे या यात्रेचे स्वागत करण्यात आले. खासदार डॉ. अमोल कोल्हे स्वतः ट्रॅक्टर चालवत होते. आमदार अशोक पवार या वेळी उपस्थित होते.

केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदी ताबडतोब उठवावी, खासगी व सरकारी असा भेदभाव न करता दूध उत्पादकांना अनुदान मिळावे, बिबट्याप्रवण क्षेत्रात शेतीला दिवसा अखंड वीजपुरवठा करावा, पीकविमा ताबडतोब मिळावा, सरसकट कर्जमाफी देऊन शेतकर्‍यांना दिलासा द्यावा, तसेच शेतकर्‍यांच्या मुलांना शैक्षणिक कर्जासाठी धोरण राबवावे, अशा मागण्या आमदार अशोक पवार यांनी केल्या.
समारोपप्रसंगी उपसरपंच मयूर करंजे यांनी कांदे देऊन मान्यवरांचा अनोखा सत्कार करून केंद्र शासनाचा निषेध केला. या वेळी शिरूरचे आमदार अशोक पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष जगन्नाथ शेवाळे, महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भारती शेवाळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष स्वप्निल गायकवाड, देवदत्त निकम, राष्ट्रवादी पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे, पक्षाचे तालुकाध्यक्ष विश्वास ढमढेरे, खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष राजेंद्र नरवडे, माजी सरपंच आबासाहेब करंजे, महिला अध्यक्षा विद्याताई भुजबळ, उपाध्यक्षा मोहिनी संतोष मांढरे, शिवसेना तालुकाप्रमुख पोपट शेलार, माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर, पंडित दरेकर, सुदीप गुंदेचा, उपसरपंच सीमा लांडे, माजी उपसरपंच मयूर करंजे, रमेश थोरात, ग्रामपंचायत सदस्या पूजा भुजबळ, सारिका सासवडे, चेअरमन गौरव करंजे, माजी चेअरमन रमेश भुजबळ, विशाल गायकवाड, अमर करंजे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

हेही वाचा :

Back to top button