पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या एक महिन्यात होणार बदल्या | पुढारी

पुणे जिल्ह्यातील अधिकाऱ्यांच्या एक महिन्यात होणार बदल्या

लोणी काळभोर : पुढारी वृत्तसेवा :  पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने ३० जून २०२४ पर्यंत मागील ४ वर्षांपैकी ३ वर्ष एकाच जिल्ह्यात कार्यरत असलेल्या सर्व अधिकाऱ्यांच्या तात्काळ बदल्या करण्याचे आदेश भारत निवडणूक आयोगाने काढले आहेत. त्यामुळे वर्षांनुवर्षे एकाच जागेवर ठाण मांडलेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या निश्चित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील अनेक अधिकारी बदली रोखण्यासाठी मंत्रालय वारी करीत असून आमदार व मंत्र्यांचे उंबरठे झिजविण्यास सुरुवात झाली आहे. पुणे जिल्ह्यातील शासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया एक महिन्यात पूर्ण करण्याचे निर्देश निवडणूक आयोगाने जारी केले आहेत.

संबंधित बातम्या :

भारत निवडणूक आयोगाने २१ डिसेंबर रोजी दिलेल्या निर्देशात म्हटले आहे की निवडणुका पारदर्शी होण्यासाठी मागील ४ वर्षात एकाच जिल्ह्यात ३ वर्षांचा कार्यकाळ पूर्ण केलेले अधिकारी बदलीसाठी पात्र आहेत. अशा अधिकाऱ्यांंच्या बदलीची प्रक्रिया ३१ जानेवारी २०२४ पर्यंत म्हणजेच अवघ्या महिना भरात पूर्ण करायची आहे. हिवाळी अधिवेशन नुकतेच समाप्त झाल्याने मंत्रालय त्याचबरोबर क्षेत्रीय अधिकारी देखील थोडेसे निर्धास्त झाले होते,मात्र आयोगाने बदली आदेशाचा बॉम्ब टाकल्याने इच्छुकांनी संभाव्य जागेवर ‘फिल्डींग’ लावण्यासाठी मंत्र्यांचे ओएसडी आणि पीए यांच्याशी संपर्क साधण्यास सुरुवात केली आहे. तर काहींनी पुढील आठवड्यात मंत्रालय गाठण्यासाठी रजेचा अर्ज देखील देण्याची तयारी केलेली दिसून येत आहे. एकूणच १ महिन्यात बदली प्रक्रिया पूर्ण करायची असल्याने प्रशासनासह जिल्ह्यातील विविध विभागात आता मोठी फेरपालट होण्याची शक्यता आहे.

बदली आदेश कोणाला लागू
महसूल विभागातील जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी,निवडणूक निर्णय अधिकारी व त्यांचे सहाय्यक अधिकारी,प्रांत, तहसीलदार, गट विकास अधिकारी यांना लागू होणारआहे. महापालिका व इतर विकास प्राधिकरणातील अधिकाऱ्यांनाही हा बदली नियम लागू असणार आहे. पोलिस दलातील पोलिस उपनिरीक्षक आणि त्यावरील दर्जाच्या सर्व अधिकारी आणि उत्पादन शुल्क विभागातील दुय्यम निरीक्षक आणि त्यावरील पदांना देखील बदली नियम लागू होणार आहे.

Back to top button